भिवंडीत स्वछता अभियानाचा उडाला बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:27 IST2021-06-29T04:27:07+5:302021-06-29T04:27:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी पालिकेने स्वच्छता अभियानदरम्यान राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा सध्या फज्जा उडाला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर ...

भिवंडीत स्वछता अभियानाचा उडाला बोजवारा
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी पालिकेने स्वच्छता अभियानदरम्यान राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा सध्या फज्जा उडाला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. मात्र या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासनाचे लक्ष नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील अंजूरफाटा येथे रस्त्याच्या कडेलाच कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा कचरा रस्त्याच्या कडेला पसरला असल्याने कचऱ्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून नाक मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे. मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया हे शहर स्वच्छतेसाठी अतोनात प्रयत्न करत असताना काही कर्मचारी व अधिकारी मात्र शहराच्या स्वच्छ भारत अभियानालाच तिलांजली देण्याचे काम करत असल्याने कचऱ्याचे ढीग साचत आहेत. विशेष म्हणजे शहरातील कचऱ्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सकाळी व रात्री कचरा उचलण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याकडे देखील पुरते दुर्लक्ष होत आहे.
या दुर्लक्षित कारभारामुळे शहरात केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा वाजले आहेत. या अभियान अंतर्गत दरमहा कचरा उचलणाऱ्या घंटागाडी ठेकेदारावर ९० लाख खर्च केला जातो. अनेक ठिकाणी ठेकेदाराकडून नियमित कचरा उचला जात नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी वेळोवेळी केल्या आहेत . तसेच औषध फवारणीही वेळेवर होत नसल्याने कचऱ्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.