ठाणे: पाचपाखाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्र मराठा मंडळाच्या तीन मजली इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीची सफाई करतांना विवेक कुमार (३०) आणि योगेश नरवनकर (३०) या दोन कामगारांचा रसायनाच्या (एसबी-२) वासाने गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दोघांचे प्राण वाचविण्यात आल्याची माहिती सूत्रंनी दिली.नौपाडयातील हरिनिवास सर्कलजवळ मोनालिसा इमारतीच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राची तळ अधिक तीन मजली इमारत आहे. याच इमारतीमधील २५ फूट खोल पाण्याची टाकी साफ करण्यासाठी रविवारी विवेक कुमार याच्यासह चौघे कामगार उतरले होते. निलेश ताम्हाणे या ठेकेदाराने बाबर या सुपरवायझरच्या देखरेखीखाली त्यांचे हे काम सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरु झाले होते. पाण्याची टाकी साफ करतांना वॉटर प्रुफींगसाठी बीएसएफ कंपनीचे एसबी -२ हे रसायन त्यांनी वापरले. त्याच्याच वासाने टाकीमध्ये त्यांचा श्वास कोंडला. यात चौघेही बेशुद्ध पडले. अर्धवट शुद्धीत असलेल्या दाेघांनी आरडाओरडा केला. हीच माहिती मराठा सेवा मंडळाकडून िमळाल्यानंतर नाैपाडा पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजध धुमाळ, रामचंद्र वळतकर आणि सहायक पेालीस निरीक्षक योगेश लामखेडे आदींच्या पथकाने अग्निशमन दलाच्या मदतीने या चौघांपैकी गणेश नरवनकर आणि मिथुन ओझा यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने डॉ. उमेश आलेगावकर यांनी उपचार केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत बाहेर काढलेले विवेक आणि योगेश यांनाही ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. टाकीत उतरलेल्या या चारही कामगारांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरड केला. त्यानंतर ही माहिती नौपाडा पोलिसांना मिळताच त्यांनी बचावकार्य केल्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या दोघांचा मृत्यू झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.पोलीस आणि डॉक्टरांची तत्परता..या दुर्घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांसह खासगी रुग्णालयाचे डॉ. उमेश आलेगावकर तिथे पोहचले. त्यांनी तातडीने उपचार केल्यामुळे सुरुवातीला टाकीतून बाहेर काढलेल्या गणेश आणि मिथुन या दोघांचे प्राण वाचल्याची माहिहती सूत्रांनी दिली.
चौघेही पडले बेशुद्ध! पाण्याच्या टाकीत गुदमरुन दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघांचे वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 20:40 IST