चाकूच्या धाकावर ओवळा गावातील दोन महिलांचे दागिने लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 00:28 IST2020-11-12T00:25:45+5:302020-11-12T00:28:55+5:30
चाकूच्या धाकावर ओवळा गावातील दोन महिलांकडील सोन्याचे दागिने तसेच २५ हजारांची रोकड असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लुबाडल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

रोकडसह दोन लाखांच्या ऐवजाची लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : चाकूच्या धाकावर ओवळा गावातील दोन महिलांकडील सोन्याचे दागिने तसेच २५ हजारांची रोकड असा सुमारे दोन लाखांचा ऐवल लुबाडल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडबंदर रोडवरील पुराणिक सिटीच्या बाजूला असलेल्या ठाकूर प्रसाद येथे राहणारी ललिता शिंगाडे (२६) ही महिला नलिनी ठाकूर हिच्यासह १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पुष्पांजली रेसिडेन्सीच्या मागे असलेल्या त्यांच्या शेतातील घरामध्ये जनावरांना चारा देण्यासाठी तसेच गायी म्हशीचे दूध काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी २५ ते ३० वयोगटातील दोन दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर ललिता यांच्या २० हजारांच्या सोनसाखळीसह ९० हजारांचे सोन्याचे दागिने तसेच नलिनी यांचे सोन्याच्या बांगडीसह ८० हजारांचे दागिने लुबाडले. तसेच त्यांच्या शेतातील घरात शिरकाव करुन २५ हजारांची रोकडही चाकूच्या धाकावर लुबाडली. चोरटयांनी या महिलांचे एक लाख ९५ हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लुबाडून पलायन केले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक के. व्ही. मोरे हे अधिक तपास करीत आहेत.