दोन बेपत्ता बालमित्रांचा मिठागर खाडीत बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 06:39 IST2019-07-15T06:39:11+5:302019-07-15T06:39:21+5:30

कोपरी पूर्व येथील सुभाषनगर परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह रविवारी मिठागर खाडी परिसरात आढळले.

Two missing sons and daughters drown in a mithagar bay | दोन बेपत्ता बालमित्रांचा मिठागर खाडीत बुडून मृत्यू

दोन बेपत्ता बालमित्रांचा मिठागर खाडीत बुडून मृत्यू

ठाणे : कोपरी पूर्व येथील सुभाषनगर परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह रविवारी मिठागर खाडी परिसरात आढळले. ते दोघे बेपत्ता असल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. दोघांचा खाडीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज कोपरी पोलिसांनी वर्तविला आहे.
शुभम विनोद देवकर (१५) आणि प्रवीण सत्यम कंचारी (१५) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही कोपरीतील सुभाषनगरमध्ये राहतात. ते एकाच शाळेचे विद्यार्थी असून, बालपणीचे मित्र आहेत. शनिवारी सायंकाळी ते दोघे मिठागर परिसरातील खाडी येथे पोहण्यासाठी गेले होते. रात्री दोघेही घरी न आल्याने पालकांनी कोपरी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
रविवारी दुपारी कोपरी येथील के.सी. इंजिनीअरिंग कॉलेजवळील मिठागर खाडी परिसरात त्यांचे मृतदेह आढळून आले. तेथे त्यांनी पोहण्यासाठी जाताना कपडे ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि कोपरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. दोघांच्या अंगावर कोणत्याही जखमा किंवा व्रण आढळलेले नाहीत.

Web Title: Two missing sons and daughters drown in a mithagar bay