येऊरच्या मुख्य रस्त्यावर दोन बिबट्यांचा मॉर्निंग वॉक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 07:15 IST2025-03-09T07:14:50+5:302025-03-09T07:15:10+5:30

बिबटे दिसल्याने ठाणे वनविभागाची जनजागृतीसाठी धावपळ

Two leopards take a morning walk on the main road of Yeoor | येऊरच्या मुख्य रस्त्यावर दोन बिबट्यांचा मॉर्निंग वॉक!

येऊरच्या मुख्य रस्त्यावर दोन बिबट्यांचा मॉर्निंग वॉक!

ठाणे : येऊर गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून दोन बिबटे गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. निर्सगरम्य येऊरमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशात बिबटे दिसल्याने ठाणे वनविभागाची जनजागृतीसाठी धावपळ सुरू झाली आहे.

येऊरच्या मुख्य रस्त्याला लागून एअर फोर्स कॅम्प आहे. तेथे बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुख्य रस्त्यावरून गुरुवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास दोन बिबटे जात असल्याचे दिसले. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊनही अद्याप येऊरच्या जंगलात बिबटे आपले अस्तित्व टिकवून असल्याची आनंददायी बाब निदर्शनास आली. त्यामधील एक बिबट्या पूर्णवाढ झालेला म्हणजे साधारणपणे तीन वर्षाचा, तर दुसरा हा एक वर्षाचा असावा असा अंदाज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ज्या मुख्य रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले त्याचा वापर येऊरचे गावकरी आणि मॉर्निंग वॉक करणारे ठाणेकर दररोज करतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता या भागात जनजागृतीचा फलक बसविण्यात येणार आहे. त्याच्यावर बिबट्या दिसल्यास नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबतची माहिती दिली जाणार असल्याचेही वन विभागाने सांगितले.

अधिवास कायम

येऊर वन परिक्षेत्रात बिबट्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, मध्यंतरी बिबट्याचे दर्शन होत नव्हते. अचानक दोन बिबट्याचे दर्शनाने झाल्याने त्यांचा अधिवास अजून येऊरच्या जंगलात कायम आहे. 
 

Web Title: Two leopards take a morning walk on the main road of Yeoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.