देशभरातील ६० जणांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या दोन सायबर भामट्यांना लखनौतून अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: December 20, 2024 19:03 IST2024-12-20T19:02:43+5:302024-12-20T19:03:03+5:30

देशभरातील अशा ६० पेक्षा अधिक लोकांना त्यांनी गंडा घातला आहे.

Two cyber crooks who scammed 60 people online across the country arrested from Lucknow | देशभरातील ६० जणांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या दोन सायबर भामट्यांना लखनौतून अटक

देशभरातील ६० जणांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या दोन सायबर भामट्यांना लखनौतून अटक

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: क्राईम ब्रान्चचे अधिकारी असून तुमच्या नावाने मनी लॉड्रींग झाल्यामुळे तुमच्याविरुद्ध अटक वारंट निघाल्याची धमकी देत ठाण्यातील वृद्धाला आठ लाख ६५ हजारांचा गंडा घालणाऱ्या रौचक श्रीवास्तव (२९, रा. लखनौ, उत्तरप्रदेश) आणि संदीप यादव (२६, रा. खुटेहना, उत्तरप्रदेश) या उच्चशिक्षित सायबर भामटयांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त हेमंत शिंदे यांनी शुक्रवारी दिली. देशभरातील अशा ६० पेक्षा अधिक लोकांना त्यांनी गंडा घातला आहे. त्यांच्याकडून पाच लाख ६५ हजारांची रोकड, पाच मोबाईल, सहा सिमकार्ड, २० डेबिट कार्ड आणि वेगवेगळया बँक खात्यांचे नऊ धनादेश असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ठाण्याच्या वागळे इस्टेटमधील रहिवासी सदानंद पाध्ये (८६) यांना २५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२४ रोजी दरम्यान एका सायबर भामटयाने राकेश सिन्हा या नावाने कॉल केला. क्राईम ब्रॅन्चचे अधिकारी असल्याचे सांगत, तुमच्या नावाने मनी लॉड्रींगचा गुन्हा दाखल झाल्याने अटक वारंट जारी केल्याचीही त्यांना धमकी दिली. प्रकरण मिटवून निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांना आठ लाख ६५ हजारांची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये आरटीजीएस करण्यास सांगितली. पाध्ये यांनी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, निरीक्षक प्रविण माने, प्रविण सावंत आणि उपनिरीक्षक जगताप यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे लखनाैच्या अभिषेक शुक्ला यांच्या बँक खात्यात पैसे गेल्याची माहिती मिळविली. तेंव्हा लखनौमधील बी टेक झालेल्या श्रीवास्तव आणि बीएसस्सी झालेल्या यादवने गेमिंगचे हे पैसे त्यांच्या खात्यात येणार असल्याचे शुक्ला यांना भासविल्याची माहिती चाैकशीत समाेर आली. खात्यावरील हे पैसे परत देण्यासाठी लाखाला एक टक्का रक्कमही देण्याचे ठरले होते. हे पैसे बँकेत येताच श्रीवास्तव आणि यादव यांनी त्यांच्या खात्यातून हे पैसे काढले. पैसे घेणाऱ्या या दाेघांची माहिती मिळताच उपनिरीक्षक जगताप यांच्या पथकाने थेट लखनऊ मध्ये जाऊन या दाेघांनाही १४ डिसेंबर २०२४ रोजी ताब्यात घेतले. त्यांना २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. त्यांनी आणखी किती जणांची किती रुपयांची फसवणूक केली, याचाही शाेध घेण्यात येत आहे.
 
देशभरातील ६० जणांची फसवणूक  
आराेपींसह त्यांच्या अन्य साथीदारांनी देशभरातील ६० जणांची करोडो रुपयांची फसवणूक केली. त्यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि ठाणे तसेच गोवा, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, हरियाणा आणि केरळ आदी राज्यांमधील ५९ बँक खात्यांमधून पैसे उकळल्याचेही तपासात समोर आले. त्यांनी फसवणूक केलेली रक्कम ही क्रिप्टो करन्सीमध्ये परावर्तित केली. त्यांच्याकडून चार हजार क्रिप्टो करन्सी (यूएसडीटी) सुमारे तीन लाख २० हजारांच्या रकमेचा शोध लागला.

Web Title: Two cyber crooks who scammed 60 people online across the country arrested from Lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.