भिवंडीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघा सख्या भावांचा मृत्यू; परिसरात शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 13:29 IST2020-10-19T13:29:40+5:302020-10-19T13:29:57+5:30
हे दोघे भाऊ डूबिने रेती काढण्याचे काम करीत होते.मात्र सद्या रेती उत्खननावर शासनाचे कडक निर्बंध असल्याने ते दोघेही गोदामांमध्ये माल खाली करण्याचे काम करीत होते

भिवंडीत ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघा सख्या भावांचा मृत्यू; परिसरात शोककळा
भिवंडी - तालुक्यातील दापोडे येथील इंडियन कार्पोरेशनच्या गोदामामध्ये भरोडी येथील राहत्या घरून ट्रकमधील माल उतरवण्यासाठी दुचाकीवरून जात असताना भरधाव विटांच्या भरलेल्या ट्रकने समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे सख्ये भाऊ जागीच ठार झाल्याची घटना रविवारी अंजूर रोडवरील श्रीराम नगर येथे घडली आहे. विश्वास लिकऱ्या भोईर (४२) व निळखंठ भोईर (३२ ) असे अपघातात ठार झालेल्या दोघा भावांची नांवे आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
हे दोघे भाऊ डूबिने रेती काढण्याचे काम करीत होते.मात्र सद्या रेती उत्खननावर शासनाचे कडक निर्बंध असल्याने ते दोघेही गोदामांमध्ये माल खाली करण्याचे काम करीत होते. दुपारी या दोघा भावांना इंडियन कंपाउंडच्या गोदामातून ट्रक खाली करण्यासाठी बोलावण्यात आले होते.त्यामुळे ते दोघे भाऊ मोटार सायकलवरून गोदामात जाण्यासाठी निघाले होते. ते दोघे अंजूर रोडवरील श्रीराम नगर येथे आले असता त्यांना समोरून आलेल्या भरधाव विटांच्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे भाऊ रोडवर खाली पडले असता ट्रकचा टायर अंगावरून गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालक फरार झाला असून या फरार ट्रक चालकाचा पोलीस कसून शोध घेत आहेत.