एकाच परमिटवर दोन रिक्षा
By Admin | Updated: November 11, 2016 02:58 IST2016-11-11T02:58:25+5:302016-11-11T02:58:25+5:30
जुनी रिक्षा विकून नवीन रिक्षा घेतल्याचे भासवायचे. मात्र प्रत्यक्षात दोन्ही रिक्षा एकाच परमीटवर चालवायच्या, असा प्रकार कल्याण डोंबिवलीत बोकाळला आहे

एकाच परमिटवर दोन रिक्षा
आकाश गायकवाड, डोंबिवली
जुनी रिक्षा विकून नवीन रिक्षा घेतल्याचे भासवायचे. मात्र प्रत्यक्षात दोन्ही रिक्षा एकाच परमीटवर चालवायच्या, असा प्रकार कल्याण डोंबिवलीत बोकाळला आहे. प्रवासी आणि रिक्षा संघटनेच्या नेत्यांच्या अंदाजानुसार अशा पद्धतीने किमान ५ हजार रिक्षा बेकायदा रस्त्यांवर धावत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील अधिकृत रिक्षांची संख्या सुमारे २५ हजार आहे. वाहतूक पोलीस व आरटीओची कृपादृष्टी अशीच राहिल्यास शहरातील रस्त्यांवर अधिकृत रिक्षांच्या तुलनेत बेकायदा रिक्षांची संख्या अधिक दिसेल, असे प्रवासी संघटनांचे मत आहे.
नवीन रिक्षा घेतल्यास तीन ते चार वर्षांनंतर देखभाल, दुरु स्तीचा खर्च सुरू होतो. त्या अवधीत कर्ज फिटल्याने अनेक रिक्षाचालक त्याच परमीटवर नवी रिक्षा चालवायला घेतात.
जुन्या रिक्षावर तुटपुंज्या पगारावरील एखादा ड्रायव्हर नेमला की एका परमीटवर २ रिक्षा धावू लागतात. एकाच नंबरच्या दोन किंवा अधिक रिक्षाही रस्त्यांवर धावत असल्याचे अनेक रिक्षाचालकांनी सांगितले. दोन्ही रिक्षांचे उत्पन्न मिळत असल्याने रिक्षाचालक खूष असतात. अशी रिक्षा आरटीओने पकडली तरी दंड भरु न सोडवता येते. अगदी जप्तीची कारवाई झाली तरी रिक्षा भंगारात जाण्याच्या स्थितीत असल्याने रिक्षा चालकांना फारसा फरक पडत नाही. त्यामुळेच बोगस रिक्षा बोकाळल्या आहेत.
या भागांत प्रमाण मोठे
डोंबिवली पश्चिमेकडील देवीचापाड, कुंभारखानपाडा, सत्यावान चौक, उमेशनगर आणि जुनी डोंबिवली तर पूर्वेतील मानपाडा रोड, टाटानाका, दावडी सागाव, सोनारपाडा ग्रामीण भाग, यामार्गांवर बेकायदा रिक्षा मोठ्या प्रमाणात आढळतात. कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा आणि खडेगोळवली मार्गावर,तसेच संध्याकाळनंतर कल्याण पश्चिमेतही अवैध रिक्षा धावतात.
५ हजारांहून अधिक बेकायदा रिक्षा!
कल्याण डोंबिवलीत ५ हजारांपेक्षा जास्त बेकायदेशीर रिक्षा असाव्यात. केवळ परमीट नूतनीकरणासाठी आलेल्या रिक्षांची तपासणी करण्याऐवजी आरटीओ अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली तर या रिक्षा सापडतील.
आरटीओ यंत्रणेकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याने, अशी अचानक तपासणीच होत नाही. त्यामुळे बेकायदा रिक्षाचालकांचे फावले आहे. बेकायदा रिक्षा चालविण्यासाठी १ हजार रू पयांचे हप्ता दिला जातो, असे बोलले जात आहे.
कल्याण डोंबिवलीत सुमारे १५० अधिकृत आणि अनधिकृ त रिक्षा स्टॅँन्ड आहेत.त्यातील बोटावर मोजण्या इतक्या रिक्षा स्टॅँन्डला रेलींग बसविण्यात आले आहे. मात्र उर्वरीत रिक्षा स्टॅँन्डला रेलींग न बसविल्याने शहरातील बहुतांश भागात वाहतूक कोंडी होत असते.
रेलिंग नसल्याचा फायदा घेऊन अनेक बेशिस्त रिक्षाचालक रस्त्याच्या मध्ये वेडीवाकडी रिक्षा लावून धंदा करतात. हे दृष्य दररोज समोर दिसत असूनही वाहतूक पोलीस डोळयावर पट्टी बांधून असतात, असे प्रवासी संघटनांचे मत आहे.