ठाण्यात बिबटयाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 20:05 IST2019-05-27T19:55:51+5:302019-05-27T20:05:08+5:30
कर्नाटकातून आणलेल्या एका बिबटयाच्या कातडीची ठाण्यात तस्करीसाठी आलेल्या राजेश अरोरा आणि मोजीस आगीमणी या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने नुकतीच अटक केली आहे.

कर्नाटकातून आणले कातडे
ठाणे: बिबटयाच्या कातडीची ठाण्यात १८ लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या राजेश अरोरा (४४, रा. मुलूंड, मुंबई) आणि मोजीस उर्फ मोजा आगीमणी (३०, रा. तुमरी कप्पा, धारवाड, जि. कलकडगी, कर्नाटक) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून बिबटयाचे कातडेही जप्त करण्यात आले आहे.
वागळे इस्टेट परिसरात दोघेजण बिबटयाची कातडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार आणि हवालदार शशिकांत नागपुरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, उपनिरीक्षक तुंगेनवार, जमादार निवृत्ती महांगरे आणि दिलीप तडवी आदींच्या पथकाने २१ मे रोजी अरोरा आणि अगीमणी या दोघांना ताब्यात घेतले. अरोरा याच्या अंगझडतीमध्ये हिरव्या रंगाच्या सॅकमधून बिबटयाची सुकवलेली कातडी आढळून आली. चौकशीमध्ये हे कर्नाटकातून आणलेल्या या कातडयाची तो १८ लाखांमध्ये विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही त्याने कबूली दिली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.