लग्न समारंभातून ४० तोळे सोने लुबाडणाऱ्या दोघांना मध्यप्रदेशातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:00 IST2021-01-29T23:58:17+5:302021-01-30T00:00:09+5:30
ठाण्यातील एका लग्नसमारंभातून ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाºया अजयसिंग कोंडाणा (२२) आणि बादल सिसोदिया (२०, रा. गुलखेडी, मध्यप्रदेश) या दोघांनाही मध्यप्रदेशातून कासारवडवली पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले आहे.

कासारवडवली पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील एका लग्नसमारंभातून ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाºया अजयसिंग कोंडाणा (२२) आणि बादल सिसोदिया (२०, रा. गुलखेडी, मध्यप्रदेश) या दोघांनाही मध्यप्रदेशातून कासारवडवली पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीतील १७ लाख ५७ हजार ९७० रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
घोडबंदर रोड, ओवळा येथे ३० नोव्हेंबर २०२० रोजी अनिता सिंग यांच्या मुलाचा विवाह सोहळा सुरु असतांना अनिता यांनी फोटो काढण्याच्या वेळी त्यांची पर्स खुर्चीवर ठेवली होती. हीच संधी साधत एका लहान मुलाच्या मदतीने चोरटयांनी ४२३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि काही रोकड असलेली पर्स अवघ्या काही मिनिटांमध्ये लंपास केली होती. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात १ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, जयराज रणवरे, अविनाश काळदाते आणि वैभव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे तसेच सागर जाधव यांच्या पथकाने मध्यप्रदेशातील राजगढ येथून बबलू सिसोदिया याच्या घरातून १९ लाख तीन हजार ५०० रुपयांचे ४२३ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले. त्यानंतर २७ जानेवारी रोजी अजयसिंग आणि बादल या दोघांना अटक केली. या गुन्हयात कासारवडवली पोलिसांनी १७ लाख ५७ हजार ९७० रुपयांचे ४० तोळयांचे दागिने हस्तगत केले. पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या तपास पथकाचे विशेष अभिनंदन केले.