माेबाइलमधील बँक तपशिलाद्वारे खात्यातून पैसे केले वळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST2021-06-29T04:26:56+5:302021-06-29T04:26:56+5:30
डोंबिवली : रेल्वे प्रवासात मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. डोंबिवलीतील रहिवासी व्रशभ शहा या प्रवाशाचा २३ जून रोजी माेबाइल ...

माेबाइलमधील बँक तपशिलाद्वारे खात्यातून पैसे केले वळते
डोंबिवली : रेल्वे प्रवासात मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. डोंबिवलीतील रहिवासी व्रशभ शहा या प्रवाशाचा २३ जून रोजी माेबाइल चाेरीला गेला हाेता. माेबाइलमध्ये असलेल्या बँक तपशिलाचा आधार घेऊन चाेरट्याने त्यांच्या बँक खात्यातून काही वेळातच २३ हजार रुपये अन्य खात्यात वळते केले हाेते. शहा यांनी याबाबत तातडीने डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली हाेती. पोलिसांनी सर्व धागेदोरे तपासून काढत मोबाइल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या पत्नीला मुंब्रा येथून अटक केली आहे. मात्र, आराेपी पती फरार असून पाेलीस त्याचा शाेध घेत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले की, मुंबई ते डोंबिवलीदरम्यान प्रवासात माेबाइल गहाळ झाल्याचे डोंबिवलीत उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ते पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेले असता त्यांच्या खात्यातून २३ हजार रुपयांची रक्कम कमी झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी त्यांचे खाते असलेल्या कॉसमॉस बँकेत जाऊन पैसे कोणत्या खात्यात वळते झाले हे तपासले. एसबीआयमध्ये शबिना शेख हिच्या खात्यावर ते वळते झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर खातेदाराचा पत्ता घेऊन पाेलीस मुंब्रा येथील त्याच्या घरी पाेहाेचले आणि तिला अटक केली. तिचा आराेपी पती कासीम शेख फरार असून चाेरलेले पैसे आणि मोबाइल त्याच्याकडे असल्याचे तिने सांगितले. शबिना हिला शनिवारी अटक करून तिला बुधवारपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तिने चाैकशीदरम्यान सांगितल्याप्रमाणे, दिवा, मुंब्रा, ठाणे आदी ठिकाणी कासीम याचा शोध पोलीस घेत आहेत. सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता.
माेबाइलमध्ये बँक तपशील ठेवू नका!
नागरिकांनी रेल्वे प्रवासात सतर्क राहावे. तसेच बँकेचे तपशील मोबाइलमध्ये ठेवू नयेत. या घटनेत बँकेचा तपशील आणि खात्याचा पासवर्ड आदी गोपनीय माहिती ठेवण्यात आली होती. त्यामुळे मोबाइल चोरल्यानंतर खात्यातून रक्कम चोरीला गेली. आता त्याचा तपास सुरू असून मुद्देमाल मिळवणे हे पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे.
--------