विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या मागण्यांसाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 02:54 IST2018-07-24T02:53:32+5:302018-07-24T02:54:05+5:30

कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली.

Tried for the demands of unaided school teachers - Chief Minister | विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या मागण्यांसाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या मागण्यांसाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री

ठाणे : कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या वेतनाच्या प्रश्नाबरोबरच अन्य मागण्या सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी नुकतेच दिले.
आ. ना. गो. गाणार व आ. निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने नागपूर येथे मुख्यमंत्र्यांबरोबर शिक्षकांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.
सेवाग्राम ते नागपूर १०५ किलोमीटरचे अंतर पायी दिंडी काढून विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसाठी शेकडो शिक्षकांनी विधानभवनावर मोर्चा काढला. ठिय्या आंदोलन केले. मात्र, त्याची दखल घेतली जात नव्हती. या संदर्भात शिक्षकांनी शासनाकडे इच्छामरणाची मागणी केली. यावेळी शिक्षक गाणार व डावखरे यांनी पुढाकार घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. तसेच शिक्षकांच्या मागणीविषयी ठोस भूमिका घेण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर फडणवीस यांच्याबरोबर कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे व उच्च माध्यमिक विनाअनुदानित कृती समितीचे तानाजी नाईक यांची शिष्टमंडळासह बैठक झाली. फडणवीस यांनी शिक्षकांच्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. शिक्षकांचे प्रश्न गंभीर असून शिक्षकांनी सुरू केलेले आंदोलन योग्य आहे. नजीकच्या काळात सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे ते म्हणाले. यावेळी आर. झेड. बावीस्कर, अजय भोयर, सुरेश कामनापुरे, प्रदिप जांगळे, एस. के. व्हाहुरवाघ, अमित प्रसाद, सुनील कल्याणी, प्रकाश पाटील, गजानन काटकर यांच्यासह अन्य शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षकांच्या प्रश्नाबाबत सहानुभूती : डावखरे
कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आपल्याला सहानुभूती आहे. आगामी काळात शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी गाणार यांच्यासह आपण सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत, असे डावखरे यांनी सांगितले.
 

Web Title: Tried for the demands of unaided school teachers - Chief Minister