उल्हासनगरात प्रशासनाच्या नाकाखाली वृक्षतोड, तहसील कार्यालयासमोर दोन जुनी झाडे भुईसपाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 18:44 IST2026-04-09T18:43:57+5:302026-04-09T18:44:12+5:30
झाडे तोडण्यास परवानगी-सहाय्यक आयुक्त अलका पवार

उल्हासनगरात प्रशासनाच्या नाकाखाली वृक्षतोड, तहसील कार्यालयासमोर दोन जुनी झाडे भुईसपाट
उल्हासनगर: शहरात आधीच हरित पट्ट्याचा अभाव असताना आता भरवस्तीत जुन्या झाडांची बेकायदा कत्तल करण्याचे धाडस वाढले आहे. कॅम्प नंबर ५ येथील तहसील कार्यालयासमोर असलेल्या एका मोकळ्या जागेतील दोन जुन्या झाडांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. महापालिका प्रभाग समितीकडून ही झाडे तोडण्यास परवानगी दिल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अलका पवार यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मधील तहसील कार्यालयासारख्या गजबजलेल्या परिसरातील एका खासगी मोकळ्या जागेत दोन डेरेदार जुनी झाडे होती. गेल्या काही दिवसांपासुन या झाडांची कत्तल करण्यात येत आहे. शहरात झाडांची संख्या आधीच कमी असताना, अशा प्रकारे निसर्गाचा ऱ्हास होत असल्याने पर्यावरणवाद्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या वृक्षतोडीबाबत प्रभाग समिती क्रमांक ४ च्या सहाय्यक आयुक्त अलका पवार यांना विचारणा केली असता, त्यांनी या झाडामुळे शेजारील घराला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे झाडे तोडण्यास परवानगी दिल्याची माहिती दिली.
शहरातील पर्यावरणाची स्थिती चिंताजनक
अवघ्या १३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात ९ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात प्रतिमाणूस झाडांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. शहरात राखीव वनक्षेत्र किंवा मोठे उद्याने नसल्याने रस्त्याच्या कडेची झाडेच ऑक्सिजनचा मुख्य स्रोत आहेत. गेल्या काही महिन्यापासून शहरात विनापरवाना झाडे तोडण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
झाडे सुकवण्याचा 'नवा पॅटर्न'?
कॅम्प नंबर ५ मधील कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी दरम्यानच्या रस्त्यावरील अनेक झाडे अचानक सुकू लागली आहेत. ही झाडे नैसर्गिकरीत्या सुकत आहेत की त्यांना केमिकल लावून मारले जात आहे, अशी शंका स्थानिक नागरिकांनी उपस्थित केली आहे. या झाडांची चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.