चहा अंगावर पडल्यावरून दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:56 IST2018-11-29T23:56:01+5:302018-11-29T23:56:08+5:30
पटना एक्स्प्रेसमधील प्रकार : ठाण्यात सहा जणांना अटक

चहा अंगावर पडल्यावरून दोन गटांत हाणामारी
ठाणे : पाटणा-ठाणे रेल्वेप्रवासात चहा अंगावर पडल्याने इगतपुरी ते ठाणे असा वाद धुमसत असताना ठाणे रेल्वेस्थानकात उतरल्यावर दुबे आणि पंडित या दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत दुबे कुटुंबातील चौघे जखमी झाले असून त्यांचे दागिने आणि रोख रककम असा ४३ हजार ५०० असा मुद्देमाल गहाळ झाला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून यामध्ये दोघे अल्पवयीन आहे. चौघांना कल्याण रेल्वे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. हा प्रकार मंगळवारी ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक ८ वर घडला.
पाटणा येथून मुंबईला येणाऱ्या पटना-कुर्ला एक्स्प्रेसमधून कळव्यातील विनय दुबे आणि बांधकाम व्यावसायिक रविशंकर पंडित (५०) ही दोन कुटुंबे प्रवास करत होती. या प्रवासात इगतपुरी येथे पंडित यांच्याकडून विनय यांच्या आत्या मीना शुक्ला यांच्या अंगावर चहा पडल्याने दोन्ही परिवारांमध्ये किरकोळ वाद झाला. तो इगतपुरीपासून ठाणे रेल्वेस्थानक येईपर्यंत सुरूच होता. मंगळवारी सकाळी गाडी ठाणे स्थानकात पोहोचताच फलाट क्र मांक-८ वरील कॅन्टीनजवळ जमलेल्या पंडित कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी गाडीतून उतरलेल्या दुबे कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. यात तक्रारदार विनय दुबे यांच्यासह मुकेश दुबे (३३), अर्पित दुबे (१७), अनुष दुबे (१६) हे चौघे जखमी झाले.
सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जाणार
याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी रविशंकर पंडित (५०), त्याचा मुलगा दुर्गेश पंडित, आकाश यादव, मनीष पाल आणि अन्य दोन अल्पवयीन मुलांना अटक के ली. तसेच स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.