अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाची ठाण्यातून यूपीला तस्करी
By Admin | Updated: September 11, 2015 00:44 IST2015-09-11T00:44:33+5:302015-09-11T00:44:33+5:30
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाची राबोडीतील एका रिक्षाचालकामार्फत थेट उत्तर प्रदेशात विक्री करणाऱ्या जन्मदात्या आईसह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती पथकाने अटक केली

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाची ठाण्यातून यूपीला तस्करी
ठाणे : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाची राबोडीतील एका रिक्षाचालकामार्फत थेट उत्तर प्रदेशात विक्री करणाऱ्या जन्मदात्या आईसह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा दिवसांच्या बाळासह दहा हजारांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे.
राबोडीतील कत्तलखान्याजवळ आलिया नावाची महिला तिच्या दहा दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मध्यवर्ती शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांना मिळाली होती. त्याआधारे, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक वसंत कांबळ आदींच्या पथकाने कत्तलखान्यासमोरील रस्त्यावर आलिया ऊर्फ अकसाना मोमिन (बदललेले नाव), रा. मुंब्रा हिला ताब्यात घेतले. आलिया आणि रिझवाना ऊर्फ रिझ्झो मोहंमद रफिक शेख यांनी हे मूल संगनमताने राबोडीतील हसनयन ऊर्फ मुन्नाभाई महंमद सईद शेख (४८) यांच्याकडे सोपविले. शेखची मानलेली बहीण सहाना अजगर उस्मानी (३७) रा. राबोडी, ठाणे हिची उत्तर प्रदेशातील (बिजनोर, धामपूर) येथील भाची उजमा उम्मानी हिला हे मूल देण्यात येणार होते. त्यापोटी सहाना हिच्याकडून शबानाने दहा हजार रुपये रोख घेतले. या संपूर्ण व्यवहारासाठी कलीम अब्बास ताहीर हुसेन (२८) या रिक्षाचालकाने मध्यस्थी केली. पोलिसांनी शबानासह रिझवाना, हसनयन, कलीम आणि सहाना या पाचही जणांना अटक केली आहे. या बाळाला आता नवी मुंबईतील विश्व कल्याण केंद्र चाइल्ड केअर सेंटर यांच्या ताब्यात देण्यात आले असून यातील पाचही आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. (प्रतिनिधी)