ठाण्यात महिलेची बॅग जबरीने चोरणाऱ्यास वाहतूक पोलिसांनी रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 22:12 IST2020-01-22T22:06:35+5:302020-01-22T22:12:15+5:30
रिक्षातून घरी जाणा-या स्पूर्ती लक्ष्मीनारायण (३९) या महिलेची बॅग जबरीने चोरुन पळ काढणा-या श्रेयस पडवळ (२०) या चोरटयाला वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी रिक्षा चालकाच्या मदतीने मंगळवारी रंगेहाथ पकडले. वाहतूक कोंडीमध्ये रिक्षाचा वेग मंदावल्याचा फायदा घेत त्याने ही चोरी केली होती.

रिक्षाचालकासह मोटारसायकलस्वाराचे प्रसंगावधान
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोपरी येथील चेक नाका परिसरात रिक्षातून जाणा-या स्पूर्ती लक्ष्मीनारायण (३९) या महिलेची बॅग हिसकावून पळणा-या श्रेयस पडवळ (२०) या चोरटयाला वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी रिक्षा चालकाच्या मदतीने मंगळवारी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून या महिलेची बॅग हस्तगत करण्यात आली आहे.
मुंबई ते नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावरील कोपरी ब्रिज येथून २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास स्पूर्ती ही प्रवासी महिला राकेश यादव (४०) यांच्या रिक्षातून घरी जात होती. कोपरी ब्रिजच्या जवळ आल्यानंतर वाहतूक कोंडी असल्यामुळे या रिक्षाची गती मंदावली होती. याचाच फायदा घेत श्रेयस याने या महिलेच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार करीत बॅग आपल्याकडे खेचण्याचा या महिलेने प्रयत्न करीत आरडाओरडा केला. त्यावेळी रिक्षा थांबविण्यात आल्याने त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. रिक्षा चालक राकेश यादव यांनी प्रसंगावधान राखून खुशाल गुरव (३३) या मोटारसायकलस्वाराच्या मदतीने श्रेयस या या चोरटयाला पकडले. त्याचवेळी तिथे पोहचलेल्या कोपरी वाहतूक उपशाखचे जमादार काशिनाथ मोरे, पोलीस हवालदार संजय पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल सावता वावळ यांनी त्यांना ताब्यात घेतले. कोपरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार टी. एन. डुंबरे हे अधिक तपास करीत आहेत.