आसनगाव स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 19:22 IST2018-02-20T19:19:01+5:302018-02-20T19:22:55+5:30
आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान मंगळवारी संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी एका मालगाडीचे इंजिन बंद पडले, त्यामुळे डाऊन मार्गावरून कसा-याला जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली होती. त्यापाठोपाठ ट्रान्स हार्बरमार्गावरील ऐरोली स्थानकादरम्यान 5 वाजून 40 मिनिटांनी एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

आसनगाव स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, वाहतूक विस्कळीत
ठाणे- आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान मंगळवारी संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी एका मालगाडीचे इंजिन बंद पडले, त्यामुळे डाऊन मार्गावरून कसा-याला जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली होती. त्यापाठोपाठ ट्रान्स हार्बरमार्गावरील ऐरोली स्थानकादरम्यान 5 वाजून 40 मिनिटांनी एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ती लोकल जागीच उभी राहिली. परिणामी ट्रान्स हार्बरची वाहतूक कोलमडली.
मुख्य मार्गावर वाहतूक सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं कसारा रेल्वेस्थानकातून एक विशेष इंजिन आसनगावच्या दिशेनं नेलं आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी बंद पडलेली वाहतूक पुन्हा हळूहळू पूर्वपदावर आली. पण त्या दरम्यान टिटवाळा ते आसनगाव डाऊन मार्गावर दोन लोकल गाड्यांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे असंख्य प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकमध्ये उतरून आसनगाव स्थानक गाठण्याचा प्रयत्न केल्याची माहिती कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे शैलेश राऊत यांनी दिली.
ऐरोली मार्गावरील घटनेमुळे प्रवासात अडकलेल्या प्रवाशांनी ठाणे खाडी पुलावर उतरून ठाणे स्थानक गाठण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटना संध्याकाळच्या वेळेत घडल्यानं चाकरमान्यांच्या हालाला पारावार उरला नव्हता.