चोरट्याची पोलीस ठाण्यातच आत्महत्या
By Admin | Updated: November 10, 2016 03:02 IST2016-11-10T03:02:24+5:302016-11-10T03:02:24+5:30
येथील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या शुभम रामप्यारे जैस्वाल (२०) याने पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे

चोरट्याची पोलीस ठाण्यातच आत्महत्या
अंबरनाथ : येथील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या शुभम रामप्यारे जैस्वाल (२०) याने पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर बुधवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्यापूर्वीच त्याने पोलीस कोठडीतील शौचालयाच्या ग्रीलचा आधार घेऊन गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण शोधण्यासाठी सीआयडीच्या पथकामार्फत तपास सुरू केला आहे.
अंबरनाथमधील सोनसाखळी चोरीकरिता जैस्वाल याला पोलिसांनी ३० आॅक्टांबर रोजी ताब्यात घेतले होते. त्यानंतर, त्याला सोडून देण्यात आले. मात्र, पुन्हा चोरीकरिता ५ नोव्हेंबरला अटक केली. त्याला न्यायालयाने ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या चार दिवसांत अंबरनाथ पोलिसांनी त्याची चौकशी केली. जैस्वालचा सहकारी सचिन भगवान म्हस्के यालाही अटक केली होती. या दोघांना वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले होते. बुधवारी दुपारी या दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वी दोन तास अगोदर शुभम हा कोठडीतील शौचालयात गेला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाची पूर्वानुमती त्याने घेतली होती. मात्र, १० मिनिटे झाली तरी आरोपी बाहेर आला नाही, हे पाहिल्यावर पोलिसाने दरवाजा तोडला असता आरोपीने शौचालयाच्या वर असलेल्या लोखंडी गजाला चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेने अंबरनाथ पोलीस चांगलेच धास्तावले आहेत. आरोपीने कोठडीत आत्महत्या केल्याने न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. आरोपीने आत्महत्या करण्यामागे घरगुती कारण असल्याचा दावा आता पोलीस करीत आहेत. मृताच्या नातेवाइकांनी मात्र अद्याप कोणतीही तक्रार न केल्याने या प्रकरणामागे नेमके काय कारण आहे, हे स्पष्ट झालेले नाही. (प्रतिनिधी)