वाहनावरील ताबा सुटला: ठाण्यात टेम्पाेच्या धडकेने टीएमटी बस थांबा काेसळला
By जितेंद्र कालेकर | Updated: March 13, 2024 20:36 IST2024-03-13T20:36:47+5:302024-03-13T20:36:56+5:30
गॅस कटरच्या सहाय्याने बस स्टाॅपला ताेडावे लागले

वाहनावरील ताबा सुटला: ठाण्यात टेम्पाेच्या धडकेने टीएमटी बस थांबा काेसळला
ठाणे: एका टेम्पाेच्या धडकेने यशाेधननगर येथील ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बस स्टाॅपचे माेठया प्रमाणात नुकसान झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर गॅस कटरच्या सहाय्याने या बस स्टाॅपला ताेडावे लागले. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
यशाेधननगर भागातील हिंदुस्थान को-ऑपरेटिव बँके समोर टेम्पो चालक गोपाळ गिरी याचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन फुटपाथवर असलेल्या बस स्टॉपवर आदळले. त्यामुळे हा बसस्टॉप खाली पडला. घटनास्थळी वर्तकनगर पाेलिसांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठा.म.पा. अतिक्रमण विभागाने धाव घेतली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून हा बसस्टाॅपही बाजूला करण्यात आला आहे. वाहन चालक गिरी यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.