कर थकविल्याने शाळेचा पाणीपुरवठा खंडीत; पालिकेची पहिल्यांदा कठोर कारवाई
By Admin | Updated: November 17, 2016 17:56 IST2016-11-17T17:56:53+5:302016-11-17T17:56:53+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेने रद्द नोटा कर वसुलीच्या माध्यमातुन स्विकारण्यास सुरुवात केल्यानंतरही अनेक थकबाकीदारांनी अद्याप कर जमा न केलेला नाही.

कर थकविल्याने शाळेचा पाणीपुरवठा खंडीत; पालिकेची पहिल्यांदा कठोर कारवाई
राजू काळे
भाईंदर, दि. 17 - मीरा-भार्इंदर महापालिकेने रद्द नोटा कर वसुलीच्या माध्यमातुन स्विकारण्यास सुरुवात केल्यानंतरही अनेक थकबाकीदारांनी अद्याप कर जमा न केलेला नाही. अशा थकबाकीदारांचा पाणीपुरवठाच खंडीत करण्याची कार्यवाही पालिकेने सुरु केली असुन बुधवारी सुमारे १९ लाखांचा कर थकविल्याने पहिल्यांदाच एका शाळेचा पाणीपुरवठा खंडीत केल्याने पालिकेच्या कठोर कारवाईचा प्रत्यय येऊ लागला आहे.
या शाळेचे नाव नित्यानंद प्रबोधिनी विद्यालय असे असुन ती एका लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक झालेले सेनेचे उपजिल्हाप्रमुख वासुभाई नांबियार यांच्या नियंत्रणाखाली चालविण्यात येत आहे. त्यात हिंदी माध्यामाचे सुमारे ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील मराठी माध्यमाचे शिक्षण पुरेशा पटसंख्येअभावी बंद झाल्याने तुर्तास हिंदी माध्यमाचे १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण सध्या सुरु आहे. या शाळेच्या प्राथमिक शिक्षणासाठी राज्य सरकारकडुन अनुदान प्राप्त होत असुन प्राथमिक व माध्यमिक वर्गांसाठी एकुण १० शिक्षक कर्तव्य बजावत आहेत.
या शाळेचा अंदाजे पाच वर्षांचा १९ लाखांचा मालमत्ता कर थकीत असल्याने पालिकेने अनेकदा शाळेला नोटीसा पाठविल्या. परंतु, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने हि शाळा कर थकबाकीदारांच्या यादीत समाविष्ट झाली आहे. कर वसुलीसाठी पालिकेने राजकीय दबावाखाली केवळ कागदी घोडे नाचवुन कारवाई बासनात गुंडाळली. अखेर हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्याने त्या कराच्या माध्यमातुन स्विकारण्यास पालिकेने सुरुवात केल्यानंतर थकीत कराच्या वसुलीला जोमाने सुरुवात झाली. करवसुली प्रभावीपणे करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी थेट पाणीपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला.
त्याचा पहिला बळी १४ नोव्हेंबरला भार्इंदर पश्चिमेकडील रॉयल रेसिडन्सी हि इमारत ठरली. सध्या या इमारतीतील रहिवाशी खाजगी टँकरद्वारे पाणी विकत घेत आहेत. यानंतर मोठ्या थकबाकीदारांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी आयुक्तांनी त्यांची यादीच प्रभाग अधिकाऱ्याकडे सोपविली. हे अधिकारी सध्या त्या थकबाकीदारांचा शोध घेऊन कर जमा करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करीत आहेत. यात कर भरण्यास असमर्थता दर्शविणाय््राा मिरागावठाण मधील नित्यानंद शाळेचा पाणीपुरवठा १६ नोव्हेंबरला खंडीत केला. काही दिवसांपुर्वी शाळेने सुमारे ७ लाखांचा कर पालिकेत जमा केल्याचे शाळा व्यवस्थापनेकडुन सांगण्यात येत आहे. परंतु, उर्वरीत कर अद्याप थकीत राहिल्याने कारवाई करण्यात आल्याचे पालिकेकडुन सांगण्यात आले. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सोबत जास्तीत जास्त पाणी घेऊन यावे लागत असुन इतर वापरासाठी आसपासच्या वस्तीतुन पाण्याची सोय केली जात आहे.
किमान शाळेचा पाणीपुरवठा खंडीत होणे अपेक्षित नसल्याची चर्चा नागरीकांत सुरु असली तरी थकीत कर प्रकरणी कोणाचीही हयगय केली जाणार नसल्याचे प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आले.
चौकट : काशिमिरा येथील वादग्रस्त ठरलेल्या काजल लॉजिंग-बोर्डींग, शेलार प्रॉपर्टिज एक्सप्रेस ईन व सुमारे ५० लाखांची थकबाकी असलेल्या लक्ष्मी कार या मोटार विक्रीच्या शोरुमचा पाणीपुरवठा देखील खंडीत करण्यात आला असुन हि कारवाई अद्यापही सुरुच असल्याचे पालिका सुत्राकडुन सांगण्यात आले