सत्तेत असूनही सेनेवर हिसका दाखवण्याची वेळ, छगन भुजबळ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 00:06 IST2019-07-01T00:06:32+5:302019-07-01T00:06:45+5:30
पश्चिमेतील माळी समाजमंदिरात एका संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात रविवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सत्तेत असूनही सेनेवर हिसका दाखवण्याची वेळ, छगन भुजबळ यांची टीका
कल्याण : शेतकऱ्यांवर पीक विमा कंपन्या अन्याय करत आहेत. पंधरा दिवसांत पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही, तर मुंबईतील संबंधित कार्यालयांना हिसका दाखवण्याची भाषा सत्तेत असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. सत्तेत असूनही सेनेवर हिसका दाखवण्याची वेळ येत आहे, म्हणजे हे सरकार कुठेतरी कमी पडत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
पश्चिमेतील माळी समाजमंदिरात एका संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात रविवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी ही टीका केली. महाराष्ट्रातील दुष्काळ आम्ही संपवू, असे सध्याच्या सरकारने २०१४ मध्ये सांगितले होते. मात्र, महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातही ठिबक सिंचन, पाझर तलाव यासारख्या योजना राबवण्यात आल्या होत्या. हे सर्व सध्याच्या सरकारने एकत्रित करून त्याला ‘जलयुक्त शिवार’ असे नाव दिले आहे.
पन्नास वर्षे कॉँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने काही केले नाही म्हणून दुष्काळ पडला, असे त्यांचे
म्हणणे होते. मग जर आता तुम्ही सगळी कामे केली आहेत, तर महाराष्ट्रात दुष्काळ कसा पडला, असा प्रश्नही भुजबळ यांनी सरकारला विचारला.
मोदींच्या विजयाबाबत संभ्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाबाबत भुजबळ म्हणाले की, हा मोदींचा विजय आहे की, ईव्हीएम मशीनचा, याबाबत आजही संभ्रम आहे. मोदी विजयी झालेत हे खरे. वंचितला सोबत घेण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसने त्यांच्या पक्षातील नेत्यांना आंबेडकरांसोबत येणाºया निवडणुकीबाबत बोलण्यास सांगितले आहे. आमच्या पक्षातील नेते किंवा पदाधिकारी हेही त्यांच्यासोबत बोलतील. त्यातून येणाºया विधानसभा निवडणुकीत काहीतरी चांगलेच घडेल.