‘त्या’ संघ व्यवस्थापकावर जेलची हवा खाण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:36 IST2017-12-07T00:36:40+5:302017-12-07T00:36:52+5:30
घोडबंदर रोडवर झालेल्या एका रस्ते अपघातप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवून कापूरबावडी पोलीस ठाण्यात अहमदनगर जिल्हा खो-खो संघाचे व्यवस्थापक सुमित चव्हाण यांच्यावर वर्षभराने गुन्हा दाखल झाला आहे

‘त्या’ संघ व्यवस्थापकावर जेलची हवा खाण्याची वेळ
पंकज रोडेकर
ठाणे : घोडबंदर रोडवर झालेल्या एका रस्ते अपघातप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवून कापूरबावडी पोलीस ठाण्यात अहमदनगर जिल्हा खो-खो संघाचे व्यवस्थापक सुमित चव्हाण यांच्यावर वर्षभराने गुन्हा दाखल झाला आहे. संघ चांगला खो-खो खेळत असल्याने व्यवस्थापक म्हणून ते संघ घेऊन ठाण्यात आले होते. या राज्यस्तरीय स्पर्धांमुळे आपल्याला प्रसिद्धी मिळेल, हाच त्यांचा हेतू होता. मात्र, त्यांच्या चुकीमुळे त्यांच्यावर आता जेलची हवा खाण्याची वेळ ओढवल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.
ठाण्यातील साकेत पोलीस मैदानात जानेवारी २०१६ मध्ये राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धा आयोजिल्या होत्या. या स्पर्धेसाठी १४ वर्षांखालील गटातील विविध जिल्ह्यांतून खो-खो संघ ठाण्यात आले होते. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश होता. संघ व्यवस्थापकाची भूमिका बजावल्याने त्यातून थोडीफार प्रसिद्धी मिळेल आणि आपले नाव होईल, असे सुमित यांना वाटले होते. त्यानुसार, ते संघ घेऊन आले. स्पर्धेतील १४ वर्षांखालील खेळाडूंसाठी आयोजकांनी राहण्याच्या व्यवस्थेबरोबर येजा करण्यासाठी बसची व्यवस्था केली होती. मात्र, ३१ जानेवारी २०१६ रोजी रात्रीचे जेवण झाल्यानंतर चव्हाण हे संघातील १० खेळाडूंना घेऊन आइस्क्रीम खाण्यासाठी घोडबंदर रोडवरील आर मॉल परिसरात जात होते.
यावेळी, त्यांनी डिव्हायडर व त्यावर रेलिंग असूनही प्रतिबंधित दुभाजकावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने कार्तिक हरदास या खेळाडूला धडक दिल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला. आणि त्यातच त्याचा मृत्यूही झाला. याप्रकरणी अनोळखी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला होता.