नोटा बदलायची वेळ झाली...
By Admin | Updated: November 10, 2016 03:23 IST2016-11-10T03:23:37+5:302016-11-10T03:23:37+5:30
ठाण्यातील लक्षावधी बँक ग्राहक गुरुवारी सकाळपासून आपापल्या बँकांमध्ये त्यांच्याकडील रद्द झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा जमा करून चलनातील नोटा घेण्याकरिता गर्दी करणार आहेत.

नोटा बदलायची वेळ झाली...
ठाणे : ठाण्यातील लक्षावधी बँक ग्राहक गुरुवारी सकाळपासून आपापल्या बँकांमध्ये त्यांच्याकडील रद्द झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा जमा करून चलनातील नोटा घेण्याकरिता गर्दी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या बँकांनी पोलीस सुरक्षेची मागणी केली आहे, त्यांना ती पुरवली जाणार असली तरी ग्राहकांची होणारी गर्दी आणि त्या तुलनेत सेवा बजावण्यास बँकांना असलेल्या मर्यादा याचा मेळ न जुळल्यास काही ठिकाणी गोंधळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतर बुधवारी बँकांचे व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे गुरुवार हा नोटा बदलण्याचा पहिला दिवस आहे. सरकारने ३० डिसेंबरपर्यंतची मुदत दिली असली तरी अनेकांचे व्यवहार पैशांअभावी अडले असल्याने लोकांची गर्दी होणार, हे स्पष्ट दिसत आहे. बँकांचे व्यवहार सुरळीत व्हावे, यासाठी पोलीस यंत्रणेनेही कंबर कसली आहे. ग्राहकांची झुंबड उडण्याची शक्यता गृहीत धरून ठाण्यातील सर्व प्रमुख बँकांना पुरेसा पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे.
पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा चलनात येणार असल्या तरी त्या लागलीच उपलब्ध होणार किंवा कसे, ते स्पष्ट नाही. साहजिकच ग्राहकांकडील बड्या रकमेच्या रद्द नोटा घेऊन त्यांना १०० रुपयांच्या नोटा देण्याची वेळ बँकांवर आली, तर सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेएवढी रक्कम तरी बँका ग्राहकांना देऊ शकतील किंवा कसे, याबाबत शंका आहे. यामुळे बँकांमध्ये संघर्षाचे प्रसंग येऊन काम विस्कळीत होऊ नये, यासाठी ठाण्यातील तीन बँकांनी पोलिसांकडे बंदोबस्त मागितला आहे. या तीन बँकांना सशुल्क संरक्षण मिळणार असले तरी इतर प्रमुख बँकांनाही आवश्यकतेनुसार ते दिले जाईल. जिल्ह्यातील प्रमुख बँकांनाही आवश्यकतेनुसार बंदोबस्त दिला जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी दिली.
रेल्वे स्थानकांत सुट्या पैशांवरून भांडणे; हॉटेल, पेट्रोलपंपांवरही पंचाईत
डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि एक हजार रुपयाच्या नोटांवर बंदी घालत असल्याचे मंगळवारी रात्री जाहीर करताच सर्वसामान्य नागरिकांची धावपळ उडाली. रात्रीपासूनच त्याचे पडसाद उमटू लागले. बुधवारी सकाळी तर रेल्वे स्थानके, पेट्रोलपंप आणि हॉटेल आदी ठिकाणी व्यवहार करताना नागरिकांची पंचाईत झाली. सुटे पैसेच नसल्याने ठिकठिकाणी भांडणे, तंटे झाले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला.
डोंबिवली, कल्याण तसेच बदलापूरपर्यंतच्या रेल्वे स्थानकांमध्ये सुट्या पैशांवरून गोंधळ सुरू होता. त्यामुळे प्रवासी आणि तिकीट वितरक यांच्यात खटके उडाले. पेट्रोलपंपचालकांनी अगोदर ५०० च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे क्रेडिट-डेबिटकार्ड स्वीकारा, असा तगादा ग्राहकांनी लावला. मात्र, ठाण्यात नोटा स्वीकारल्याचे वृत्त व्हायरल होताच वाहनचालकांनी नोटा स्वीकारण्याची मागणी रेटून नेली. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. हॉटेल व्यावसायिकांचीही प्रचंड कोंडी झाली. खाणेपिणे झाल्यानंतर ग्राहक ५०० रुपयांच्या नोटा देत होते. त्यामुळे व्यावसायिक नोटांऐवजी क्रेडिट-डेबिट कार्ड स्वीकारत होते. काही ठिकाणी उधारीवर हॉटेलिंगचा आनंद लुटण्यात आला.