लाचखोर पाटाेळेसह तिघांची रवानगी ठाणे कारागृहात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:22 IST2025-10-07T09:22:10+5:302025-10-07T09:22:20+5:30
मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य करण्याच्या माेबदल्यात ७० लाखांची मागणी करून पाटोळे यांनी ३५ लाख रुपये त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून १ ऑक्टाेबर राेजी स्वीकारले हाेते.

लाचखोर पाटाेळेसह तिघांची रवानगी ठाणे कारागृहात
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटाेळे यांच्यासह तिघांना ठाणे न्यायालयाने सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली. वैद्यकीय तपासणीनंतर पाटोळे यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य करण्याच्या माेबदल्यात ७० लाखांची मागणी करून पाटोळे यांनी ३५ लाख रुपये त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून १ ऑक्टाेबर राेजी स्वीकारले हाेते. यातील नाेटीस देण्यासाठीच्या २० लाखांपैकी १० लाख रुपये सुशांत सुर्वे याच्या बॅंक खात्यामार्फत स्वीकारले. प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसाठी ५० लाखांपैकी २५ लाख रुपये ओमकार गायकर याच्यामार्फत स्वीकारले. याच प्रकरणात पाटाेळेसह दाेघांना मुंबई तर सुर्वे याला ठाणे एसीबीने अटक केली हाेती. पाटाेळे यांना दाेन वेळा एसीबीची काेठडी मिळाल्यानंतर साेमवारी त्यांच्या काेठडीची मुदत संपली. सरकारी वकील संजय लाेंढे यांनी आराेपीला आणखी एसीबीची काेठडी देण्याची मागणी केली. आराेपीने तपासात संपूर्ण सहकार्य केले असून दाेन वेळा एसीबीची काेठडी दिल्याची बाजू आराेपीचे वकील विशाल भानुशाली यांनी मांडली. त्यानंतर तिन्ही आराेपींना न्यायालयीन काेठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
जामीन अर्जावर तत्काळ सुनावणी फेटाळली
सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावताच पाटाेळे यांचे वकील भानुशाली आणि जयेश तिखे यांनी आराेपींच्या ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर मंगळवारी सुनावणीची मागणी करण्यात आली. मात्र, जामीन अर्जावर ८ ऑक्टोबर रोजी सुनावणीचे आदेश न्या. शिंदे यांनी दिले. त्यामुळे तिन्ही आरोपींची आता दाेन दिवसांसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली.