ऐनाचीवाडीत आढळली तीन कुपोषित बालके
By Admin | Updated: October 14, 2016 06:40 IST2016-10-14T06:40:59+5:302016-10-14T06:40:59+5:30
तालुक्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. आदिवासी भागातील ऐनाचीवाडीमध्ये महिला बालकल्याण विभागाच्या दुर्लक्षामुळे एकाच

ऐनाचीवाडीत आढळली तीन कुपोषित बालके
कर्जत : तालुक्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. आदिवासी भागातील ऐनाचीवाडीमध्ये महिला बालकल्याण विभागाच्या दुर्लक्षामुळे एकाच आदिवासी वाडीत तीन कुपोषित बालके आढळली आहेत. अंगणवाडी सेविका आणि आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका यांची अनुपस्थिती यामुळे कुपोषित बालके यांची प्रकृती खालावत आहे. दरम्यान, त्या तिन्ही कुपोषित बालकांना लोकवर्गणी काढून पोषण आहार देण्यासाठी कर्जत तालुका आदिवासी संघटना सरसावली आहे.
खांडस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील ऐनाची वाडीमध्ये तीन कुपोषित बालके आढळली आहेत. नांदगाव ग्रामपंचायतीमधील या वाडीमध्ये मिनी अंगणवाडी आहे, तेथील महिला बालकल्याण विभागाच्या वतीने काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका २०१२ नंतर सेवेत असूनही ऐनाची वाडीतील अंगणवाडीमध्ये फिरकल्या नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत तेथील मदतनीस अंगणवाडीमध्ये दुहेरी जबाबदारी पार पाडत आहेत. मदतनीस या पोषण आहार बनवून देण्यापासून वाडीमध्ये फिरून बालकांना अंगणवाडीत आणणे,आणि त्यांना अंगणवाडीत खिळवून ठेवण्याची कामे करीत आहेत. अंगणवाडी मदतनीस यांची त्यामुळे कसरत होत असून कर्जत महिला बालकल्याण विभागाच्या निष्काळजीपणामुळे तेथील कुपोषण वाढत आहे. त्या भागातील अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि कर्जत तालुक्याचे प्रकल्प अधिकारी यांना पाच वर्षात अंगणवाडी सेविका अंगणवाडीत येत नसताना त्यावर कार्यवाही करावी असे वाटत नसल्याने कर्जत तालुका आदिवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
ऐनाची वाडीतील श्रेयस किरण वाघ, रोहित नाना पादिर आणि ऋ षभ नाना पादिर ही तीन बालके कुपोषित असल्याची माहिती मिळताच कर्जत तालुका आदिवासी संघटनेने वाडीत जाऊन माहिती घेतली. अंगणवाडी सेविका येत नाहीत यामुळे या कुपोषित बालकांवर दुर्लक्ष होत असून या शाळेतील बालकांची आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी असलेल्या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका उपलब्ध नसतात. चई या गावी असलेल्या आरोग्य उपकेंद्रात नियुक्तीवर असलेल्या आरोग्य सेविका यांना राहण्याची सोय जिल्हा परिषदेने करून दिलेली असताना त्या सेविका तेथे राहत नसल्याची तक्र ार आदिवासी संघटनेने केली आहे. अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका यांची अनुपस्थिती आमच्या आदिवासी मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत आहे असे येथील ग्रामस्थांसह संघटनेच्या सदस्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)