Three hundred swine flu patients in Thane district | ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण तीनशेच्या घरात, ११ महिन्यांची आकडेवारी, २२ जण दगावले

ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण तीनशेच्या घरात, ११ महिन्यांची आकडेवारी, २२ जण दगावले

ठाणे : ठाणे जिल्ह्यात १ जानेवारीपासून २५ नोव्हेंबरदरम्यान स्वाइन फ्लूबाधित रुग्णांचा आकडा हा जवळपास ३०० च्या आसपास पोहोचला आहे. त्यामध्ये २७० जण सुखरूपरीत्या उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर, या ११ महिन्यांमध्ये २२ जण स्वाइन फ्लूने दगावले आहेत. यापैकी १४ जण हे कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दगावल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

ठाणे जिल्हा हा ग्रामीण आणि शहरी असा विखुरला असून जिल्ह्यात एकूण सहा महानगरपालिका आहेत. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयांप्रमाणे जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या रुग्णालयांतही स्वाइन फ्लूच्या विशेष वॉर्डची व्यवस्था केली आहे.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण १० वॉर्ड तयार कार्यान्वित आहेत. तसेच १२७ स्कॅनिंग सेंटर असून तेथे १ जानेवारी ते २५ नोव्हेंबरदरम्यान एक लाख २४ हजार ८२९ जणांनी तपासणी केली आहे. त्यामध्ये ४३८ संशयित रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी २९५ जणांना स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ठाणे महापालिकेच्या हद्दीत ११९, कल्याण-८९ आणि नवी मुंबई-४१ तसेच मीरा-भाईंदर-४४ तर जिल्हा रुग्णालयात दोन रुग्णांचा समावेश आहे. तसेच उल्हासनगर तसेच भिवंडीत अद्याप एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

तपासणीत नवी मुंबई आघाडीवर
अकरा महिन्यांत तपासणी केलेल्या सव्वा लाखांपैकी ९१ हजार जण हे फक्त एकट्या नवी मुंबईतील आहेत. तर, सर्वात कमी एक हजार १५७ जण हे भिवंडीतील आहेत. जिल्हा रुग्णालयात १३ हजार ५०७, ठामपा सहा हजार ३५४, क ल्याण-डोंबिवली दोन हजार ११५, उल्हासनगर सात हजार ६८६, तर मीरा-भार्इंदर दोन हजार ९३२ जणांनी तपासणी केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

उपचार घेऊन परतले २६८ जण घरी
१ जानेवारी ते २५ नोव्हेंबरदरम्यान,जिल्ह्यात २९५ जणांना स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाला असून त्यातील २६८ जण आतापर्यंत सुखरूपरीत्या घरी परतले आहेत. यामध्ये ठामपा हद्दीत सर्वाधिक १११ त्याचपाठोपाठ कल्याण-७५, नवी मुंबई-४० तर मीरा-भार्इंदर येथील ४२ रुग्णांचा समावेश आहे.

अकरा महिन्यांत २२ दगावले
ठाणे जिल्हा रुग्णालयात एक, ठामपा कार्यक्षेत्रात पाच आणि कल्याणात-१४, तर मीरा-भार्इंदरमध्ये दोन जण दगावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Three hundred swine flu patients in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.