उत्तम आरोग्यासाठी धावल्या हजारो महिला
By Admin | Updated: March 20, 2017 02:05 IST2017-03-20T02:05:35+5:302017-03-20T02:05:35+5:30
अगदी ४ महिन्याच्या तान्ह्या मुलींपासून ते ८४ वर्षाच्या वयोवृद्ध महिलांबरोबरच विशेष मुलींचा उत्स्फूर्त सहभाग, त्यातून त्यांनी

उत्तम आरोग्यासाठी धावल्या हजारो महिला
ठाणे : अगदी ४ महिन्याच्या तान्ह्या मुलींपासून ते ८४ वर्षाच्या वयोवृद्ध महिलांबरोबरच विशेष मुलींचा उत्स्फूर्त सहभाग, त्यातून त्यांनी उत्तम आरोग्यदायी जीवनशैलीचे पटवून दिलेले महत्त्व आणि त्यांना ठाणेकरांनी दिलेली उत्तम दाद अशा उत्साही वातावरणात दोस्ती ठाणे गोइंग पिंक रविवारी ठाण्यात झाली. ‘लोकमत’ त्याचे माध्यम प्रायोजक होते.
आरोग्यदायी जीवनशैलीच्या महत्त्वाविषयी आणि स्तनाच्या कर्करोगासारख्या आजारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित उपक्रमाच्या पहिल्या पर्वाची सांगता या गोइंग पिंकने झाली. मिरॅकल मुंज अॅण्ड रनटास्टिक दिलसे व बोर्र्डिंग काईटस् एंटरटेनमेंटच्या सहयोगाने दोस्ती ठाणे गोइंग पिंक आयोजिली होती. सुपर मॉडेल, अभिनेता आणि पिंकेथॉनचा संस्थापक मिलिंद सोमण आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झेंडा दाखविल्यावर या गोइंग पिंकला सुरूवात झाली. २१ किमी, १० किमी., ५ किमी. आणि ३ किमी. अशा ४ गटांतील या स्पर्धेत विविध वयोगटातील सुमारे ४ हजार महिला सहभागी झाल्या होत्या. त्यात नवीन बाळांना जन्म दिलेल्या सुमारे २० मातांनीही आपल्या तान्ह्या बालकांसह साधारण ३ किमीचे अंतर चालत सहभाग नोंदविला. तर सुमारे ६० विशेष मुली आणि काही कॅन्सर पर्यवेक्षकही या पिंकमध्ये धावले. बाळकूम येथून या पिंकला सुरूवात होऊन ती कोलशेतमार्गे जाऊन पुन्हा बाळकूम येथेच तिची सांगता झाली.
सक्षम महिलांद्वारे करण्यात येणाऱ्या चळवळीची ही सुरूवात आहे. सक्षम महिलांतूनच स्वस्थ परिवार, स्वस्थ देश आणि स्वस्थ जगाची सुरूवात होते. सक्षमीकरण ही स्वत:च स्वत:ला दिलेली देणगी आहे. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार महिला, कॅन्सर पर्यवेक्षक, विशेष मुली या ठाणे गोइंग पिंकमध्ये उत्साहाने सहभागी झाल्याचा आनंद आहे, असे मत मिलिंद सोमण यांनी व्यक्त केले.
वुमेन मॅरेथॉनच्या अनोख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य, स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्यादृष्टीने दोस्ती ठाणे गोइंग पिंक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे, याचे समाधान असल्याचे मत दोस्ती रिअॅलिटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक गोराडीया यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)