‘ओवळा-माजिवडा’त हजारो मतदारांकडे ओळखपत्रांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:50 AM2019-09-23T01:50:24+5:302019-09-23T01:50:40+5:30

चार लाख ४७ हजार ५३० मतदारांचा समावेश : ४३० मतदानकेंद्रांचा समावेश

Thousands of voters lack identity cards in 'Oval-Majivada' | ‘ओवळा-माजिवडा’त हजारो मतदारांकडे ओळखपत्रांचा अभाव

‘ओवळा-माजिवडा’त हजारो मतदारांकडे ओळखपत्रांचा अभाव

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये चार लाख ४७ हजार ५३० मतदार असून त्यापैकी ८८.५७ टक्के मतदारांकडे ओळखपत्रे आहेत. उर्वरित ५१ हजार १५२ अर्थात ११.४३ टक्के मतदारांकडे अद्यापही निवडणूक आयोगाच्या ओळखपत्रांचा अभाव आहे. बहुसंख्येने मतदान होण्यासाठी जनजागृती सुरु असून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बागल यांनी केले आहे.

ओवळा-माजिवडा या १४६ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देण्यासाठी रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या मतदारसंघाच्या पोखरण रोड क्रमांक दोन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील कार्यालयात बागल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मतदारसंघातील ४३० मतदानकेंद्रांपैकी ३७७ आणि ३७८ या क्रमांकांची दोन मतदानकेंदे्र महिलांसाठी असणार आहेत. या मतदारसंघांत दोन लाख ४३ हजार ८१५ पुरुष, तर दोन लाख तीन हजार ७०४ महिला तसेच ११ इतर मतदार आहेत. ३१ आॅगस्ट २०१९ च्या अंतिम यादीनुसार या मतदारसंघामध्ये तीन लाख ९२ हजार १७१ फोटो मतदार, तीन लाख ९६ हजार ३७८ इपिक अर्थात ओळखपत्रधारक मतदार आहेत.

४३० पैकी ३९१ तळमजल्यावर, तर ९१ पहिल्या मजल्यावर मतदानकेंद्रे आहेत. पहिल्या मजल्यासाठीही लिफ्टची सुविधा आहे. मतदारसंघात एकूण ८०३ दिव्यांग मतदार असून त्यांच्यासाठी व्हीलचेअर तसेच वाहनांचीही सुविधा दिली जाणार आहे. निवडणुकीत प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपले नाव मतदारयादीत असल्याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. तरी सर्व मतदारांनी १९५० या टोल फ्री क्र मांकावर संपर्क साधून आपले नाव मतदारयादीत असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन बागल यांनी मतदारांना केले आहे.

पोखरण रोडवर होणार मतमोजणी
या विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पोखरण रोड क्रमांक दोन, ठाणे येथे होणार आहे. याच ठिकाणी ईव्हीएम मशीन स्ट्राँगरूमध्ये ठेवण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रि या सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी ४७३ अधिकाऱ्यांसह ४७३ पोलीस असे दोन हजार ८३८ कर्मचारी याठिकाणी तैनात राहणार आहेत.

१११ अंध मतदारांचा समावेश
या मतदारसंघांमध्ये १११ अंध, ७३ कर्णबधिर, इतर २२८ अशा ८०३ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. महिलांसाठी श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल, तळमजला, रूम क्रमांक एक हे ३७७ तर त्याचठिकाणी रूम क्रमांक दोन मध्ये ३७८ ही दोन महिलांसाठी मतदानकेंद्रे आहेत.

११५ सैनिक मतदार
या मतदारसंघामध्ये आतापर्यंत ११५ सैनिक मतदारांच्या नावांची नोंद केली आहे. तर, मागणीनुसार संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना टपाली मतपत्रिकावाटप करण्याचे नियोजनही केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Thousands of voters lack identity cards in 'Oval-Majivada'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.