तिसऱ्या लाटेत १२ हजार रुग्णांकरिता करावा लागेल बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST2021-05-27T04:42:28+5:302021-05-27T04:42:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कल्याण-डोंबिवलीत सध्या रुग्णसंख्या कमी झाली असल्याने रुग्णांना होम क्वारंटाईन न करता ...

तिसऱ्या लाटेत १२ हजार रुग्णांकरिता करावा लागेल बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कल्याण-डोंबिवलीत सध्या रुग्णसंख्या कमी झाली असल्याने रुग्णांना होम क्वारंटाईन न करता कोविड केअर सेंटर अथवा कोविड क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्याच्या राज्याच्या आरोग्य विभागाच्या निर्णयाची अंमलबजावणी करता येईल. मात्र दुसरी लाट उंचीला होती तेव्हा या दोन्ही शहरांत एका दिवसाला अडीच हजार नवे रुग्ण आढळत होते व त्या वेळी नऊ हजारांच्या आसपास रुग्ण होम क्वारंटाईन होते. त्यामुळे एकाचवेळी १० ते १२ हजार रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याची या दोन्ही शहरांमधील महापालिका व खासगी इस्पितळांकडे यंत्रणा नाही. जर ती निर्माण करायची तर सध्याच्या वैद्यकीय सुविधांमध्ये तिप्पट वाढ करावी लागेल.
राज्याच्या आरोग्य विभागाने ठाणे जिल्ह्यासह १८ जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांचे होम क्वारंटाईन बंद केले आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण - डोंबिवली ही शहरे कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या वेळी हॉटस्पॉट बनली होती. पहिल्या लाटेच्या वेळी महापालिका हद्दीत जुलै २०२० महिन्यात एका दिवसाला सर्वाधिक ६६४ रुग्ण आढळून आले होते. महापालिका हद्दीत दुसरी लाट फेब्रुवारी महिन्याच्या १७ तारखेनंतर सुरू झाली. या लाटेत दिवसाला २ हजार नवे रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे महापालिकेची कोविड सेंटर, रुग्णालये आणि खाजगी कोविड रुग्णालयांत चार ते पाच हजार रुग्ण उपचार घेत होते. परिमाणी रुग्णांना बेड, इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. वेळेवर बेड न मिळाल्याने काहींनी प्राण गमावले. दुसऱ्या लाटेत ११ एप्रिल रोजी सगळ्यात जास्त म्हणजे २ हजार ४०५ रुग्ण एका दिवसात आढळून आले. याच दिवशी महापालिका आणि खाजगी कोविड रुग्णालयांत एकूण ५ हजार रुग्ण उपचार घेत होते. याच दिवशी होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या ८ हजार ९६९ होती. ही आकडेवारी पाहता हेच स्पष्ट होते की, जेव्हा कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक वाढते तेव्हा या शहरांत जास्तीतजास्त पाच हजार रुग्णांचीच महापालिका कोविड सेंटर, खासगी इस्पितळे व कोविड क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्था होऊ शकते. शासनाने त्या वेळी होम क्वारंटाईन बंद केले असते तर ८ हजार ९६९ रुग्णांना या दोन्ही शहरातील रुग्णालयांत बेड उपलब्ध झाले नसते. सध्या रुग्णसंख्या कमी झाल्याने महापालिका व खासगी इस्पितळांनी सुरू केलेली कोविड सेंटर सुरू राहावी याकरिता सरकारने हा निर्णय घेतला आहे. पहिल्या लाटेच्या वेळी रुग्णसंख्या घटल्यावर कोविड सेंटर बंद झाली. तेथील वैद्यकीय सुविधांची पळवापळवी झाली. पुन्हा तेच घडू नये व यदाकदाचित सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट आली तर पुन्हा यंत्रणेचा फज्जा उडू नये याकरिता आरोग्य विभागाने हा आदेश दिला आहे. मात्र काही रुग्ण हे घरापासून, कुटुंबापासून दुरावल्याने भीतीपोटी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे बळावली व ते मरण पावले किंवा काही काळ त्यांची प्रकृती गंभीर झाली. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांबाबत हे घडले आहे. अनेकांना कोविड केअर सेंटर अथवा क्वारंटाईन सेंटरमधील जेवण पसंत न पडल्याने त्यांची आबाळ झाली. कोरोना काळात घेतली गेलेली औषधे व पुरेसा सकस आहाराचा अभाव यामुळे काहींना त्रास झाला. त्यामुळे सरसकट होम क्वारंटाईनची सुविधा बंद केल्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे डॉक्टर व कोरोना रुग्णांचे मत आहे.
तिसऱ्या लाटेच्या वेळी दिवसाला दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यास आरोग्य विभाग होम क्वारंटाईन बंद करण्याचा निर्णय कायम ठेवणार की मागे घेणार, असा प्रश्न आहे.
.........
केडीएमसीकडे आजमितीस १ हजार २०० ऑक्सिजन बेड तर ३५० आयसीयू बेड उपलब्ध आहेत. सध्या रुग्णसंख्या कमी होत आहे. दिवसाला २०० कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी ५० लोकांनाच बेडची आवश्यकता आहे. उर्वरित रुग्ण हे सौम्य लक्षणांचे असल्याने त्यांना बेडची गरज भासत नाही. त्यांच्यावर टाटा आमंत्रा येथे उपचार केले जात आहेत. त्या ठिकाणी ३ हजार रुग्णांची व्यवस्था केली आहे. राज्य सरकारने कुटुंबातील अन्य सदस्यांना संसर्ग टाळण्यासाठी होम क्वारंटाईनऐवजी रुग्णालयात भरती करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चांगला आहे. यापूर्वीच सहव्याधी असलेल्या कोविड रुग्णांचे होम क्वारंटाईन महापालिकेने बंद केले आहे.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महापालिका
--------------------------
वाचली.