पत्रा तोडून मोबाईल दुकानात चोरी करणाऱ्या चोरटयास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 23:32 IST2021-01-01T23:29:33+5:302021-01-01T23:32:35+5:30
कासारवडवली येथील एका मोबाईल दुकानाचा पत्रा तोडून मोबाईलची चोरी करणाºया यश दशरथ गायकवाड (१९) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला ४ जानेवारी पर्यन्त पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

७६ हजारांचे २४ मोबाईल हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कासारवडवली येथील एका मोबाईल दुकानाचा पत्रा तोडून मोबाईलची चोरी करणाºया यश दशरथ गायकवाड (१९, रा. साईनाथ नगर, माजीवाडा, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ७६ हजारांचे २४ मोबाईल हस्तगत केल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली.
कासारवडवलीतील ‘वेलकम मोबाईल शॉप’ या दुकानामध्ये २५ डिसेंसबर २०२० रोजी रात्री १० ते २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दुकानाचा पत्रा तोडून चोरटयांनी मोबाईल चोरल्याचे २६ डिसेंबर रोजी दुकान मालकाच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर जाधव आणि त्यांच्या पथकाने काशीमीरा, कापूरबावडी आणि वर्तकनगर आदी परिसरात चोरटयांचा शोध घेतला. त्याचदरम्यान, पोलीस पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे यामध्ये यश गायकवाड हा चोरटा असल्याचे उघड झाले. त्याच अनुषंगाने सापळा रचून आनंद नगर येथून त्याला या पथकाने २९ डिसेंबर रोजी अटक केली. सखोल चौकशीमध्ये त्याने मोबाईल दुकानातील चोरीची कबूली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीचे २४ मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याच्यावर चोरी, घरफोडीसह अनेक गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले. ठाणे न्यायालयाने त्याला ४ जानेवारी पर्यन्त पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्याकडून आणखीही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.