खाडीत उडी घेणाऱ्या भिवंडीतील ‘त्या’ दोघांचाही शोध सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 20:53 IST2018-07-16T20:41:22+5:302018-07-16T20:53:00+5:30

एकमेकांवर प्रेम असल्याचा दावा करीत आम्ही आत्महत्या करीत असल्याचा व्हीडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड करुन नंतर खारेगावच्या खाडीत उडी घेणा-या युगूलाचा सोमवारी दुस-या दिवशीही शोध सुरुच होता.

They both started searching for both of them | खाडीत उडी घेणाऱ्या भिवंडीतील ‘त्या’ दोघांचाही शोध सुरुच

दोघेही कोनगावातील रहिवाशी

ठळक मुद्देदोघेही कोनगावातील रहिवाशीमुलगी बेपत्ता असल्याची पालकांची तक्रारनारपोली पोलिसांकडून तपास सुरु

ठाणे: खारेगाव खाडीमध्ये उडी घेणा-या शिवपाल चौधरी (२०) आणि खुशी (१७) या दोघांचा यासोमवारी दुस-या दिवशीही पोलीस आणि अग्निशमन दल यांच्याकडून शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा कोठेही शोध लागला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेरोशायरीच्या चिठ्ठ्या तयार करून आम्ही १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता खारेगाव खाडीत आत्महत्या करत आहोत, असा व्हिडीओ मोबाइलमध्ये तयार करून शिवपाल याने त्याच्या मैत्रिणीसह खारेगाव येथील खाडीत स्वत:ला रविवारी दुपारी झोकून दिले. या दोघांनी खाडीत उडी घेतल्याची माहिती एका वाटसरूने कळवा वाहतूक शाखेच्या पोलिसांना रविवारी दुपारी दिली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा त्यांना पुलावर एक बॅग मिळाली. या बॅगेत मोबाइल आणि काही चिठ्ठ्या मिळाल्या. आम्ही आत्महत्या करत आहोत, असे सांगणारा व्हिडीओ त्यांनी मोबाइलमध्ये तयार केला होता. शिवपाल हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो एका मालगाडीवर क्लीनरचे काम करतो. कोनगावात ज्या भागात ही मुलगी वास्तव्याला आहे, त्याच भागात तोही वास्तव्याला आहे. दोघांची चांगली ओळख होती. त्यामुळे त्यानेच या मुलीला फूस लावून पळवल्याचा किंवा आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा पोलिसांचा संशय आहे. जोपर्यंत ते हाती लागत नाहीत, तोपर्यंत तरी यातील नेमकी वस्तुस्थिती सांगणे अवघड असल्याचे नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माणिक कथोरे यांनी सांगितले. दरम्यान, शिवपालच्या नातेवाइकांनी त्याच्या जाण्याबद्दल फारसा खेद व्यक्त केला नाही. या मुलीच्या नातेवाइकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार कोनगाव पोलीस ठाण्यात रविवारी दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे शिवपालने तिला पळवून नेल्याचीही शक्यताही व्यक्त केली जात आहे.
.........................
दोन वर्षांपूर्वीही अशीच घटना
दोन वर्षांपूर्वीही भिवंडीच्या खाडीपुलावर अशाच प्रकारे एका मुलाने आत्महत्येचा बनाव करून गाडी पुलावर सोडून एका मुलीसोबत पलायन केले होते. कालांतराने तो मुलगा एका मुलीसह गुजरातमध्ये वास्तव्याला असल्याची बाब समोर आली होती. असाच हा प्रकार आहे का, त्यादृष्टीनेही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: They both started searching for both of them