नालेसफाई झाली; मात्र गाळ रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST2021-05-31T04:28:58+5:302021-05-31T04:28:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पावसाळ्याआधी शहरातील नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे; परंतु शहरातील नालेसफाईवरून सध्या राजकारण चांगलेच तापले ...

नालेसफाई झाली; मात्र गाळ रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पावसाळ्याआधी शहरातील नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे; परंतु शहरातील नालेसफाईवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी शिवसेनेने ७० टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा केला आहे, तर ही ‘नालेसफाई नसून हात की सफाई’ असल्याचा आरोप करीत भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे; परंतु प्रत्यक्ष पाहणीत नाल्यांची सफाई ही वरवर झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ७० टक्के नालेसफाई झाली असली तरी पावसाळ्यात हा दावा फोल ठरणार असल्याचेच दिसत आहे. त्यातही नाल्यातील गाळ काढून रस्त्याच्या कडेला किंवा काही नाल्यांच्या बाजूलाच त्याच ढिगारा लावण्यात आला आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेला गाळ वाहनांमुळे अस्ताव्यस्त झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.
ठाण्यातील नाल्यांची सफाई हा दरवर्षी वादग्रस्त मुद्दा ठरतो. यंदाही नालेसफाईच्या कामाला उशिराने सुरुवात झाली आहे. त्यामुळे वेळेत नालेसफाई होणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. असे असताना आता ३१ मेपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. दरम्यान, प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत आजही शहराच्या विविध भागात नाल्यांची सफाई सुरू आहे. त्यानुसार ७० टक्क्यांपर्यंत गाळ काढण्यात आल्याचे दिसत आहे; परंतु खालपर्यंत गाळ मात्र काढला गेलेला नाही. यासंदर्भात पालिकेशी चर्चा केली तर खालचा गाळ काढायचा झाला तर त्यासाठी लागणारे बजेट पालिकेकडे नाही. त्यासाठी ३५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे; परंतु सध्या नालेसफाईसाठी ९ कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्यानुसार कामे सुरू असल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे; परंतु असे असले तरीही अनेक ठिकाणी नाल्यातील गाळ एक तर रस्त्यांच्या कडेला टाकण्यात आला आहे किंवा काही ठिकाणी तर नाल्यातील गाळ हा नाल्याच्या बाजूलाच असलेल्या मातीवर रचून ठेवण्यात आला आहे. घोडबंदरच्या अनेक नाल्यांच्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. पावसाळ्याच्या आत हा गाळ उचलला गेला नाही तर पावसामुळे पुन्हा तो गाळ मातीसकट नाल्यात येऊन त्याचा परिणाम येथील रहिवाशांना भोगावा लागणार आहे.
दुसरीकडे रस्त्यांवरही गाळ काढून टाकण्यात आला आहे. हा गाळ ओला असल्याने सुकल्याशिवाय तो नेता येत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे; परंतु अनेक ठिकाणी हा गाळ आता रस्त्यावर इतरत्र पसरू लागला आहे. वाहनांमुळेही हा गाळ रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे हा त्रासदेखील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे गाळ जरी काढल्याचा दावा केला जात असला तरी कुठेतरी हात की सफाई झाल्याचेच दिसत आहे, तर या नालेसफाईचे चित्रीकरण करण्यात येत असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे छायाचित्रीकरणही करण्यात आलेले नाही.
नाल्यांची माहिती
प्रभाग समिती- मोठे नाले -छोटे नाले
कळवा - १ - १८८
नौपाडा - ३ - ४४
वागळे- १३ - २५
लोकमान्य - १ - ३३
उथळसर - १ - ३१
वर्तकनगर - ७ - २२
माजीवडा, मानपाडा - ८- ३१
मुंब्रा - ० - ६१
दिवा- ४ - १२५
एकूण- ३८ - ५६०