लग्नानंतर वेडे ठरवण्याचे वाढते प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 11:55 PM2019-09-21T23:55:00+5:302019-09-22T06:44:36+5:30

अनेकांच्या घटस्फोटासाठी कारण; कौटुंबिक न्यायालयातील निरीक्षण

There is a growing trend of going crazy after marriage | लग्नानंतर वेडे ठरवण्याचे वाढते प्रमाण

लग्नानंतर वेडे ठरवण्याचे वाढते प्रमाण

Next

- स्नेहा पावसकर 

ठाणे : विशेष विवाह नोंदणी कायदा १९५४ नुसारच्या विवाह नोंदणी फॉर्ममध्ये एका रकान्यात आपण वेडे नाहीत, हे जाहीरपणे कबूल करावे लागते व सध्या हाच वादविषय झाला आहे. वास्तवात कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या जोडप्यांपैकी अनेकांच्या घटस्फोटाचे कारण हा वेडेपणा ठरतो आहे.

नोंदणी पद्धतीने विवाह करताना कायदेशीर प्रक्रिया म्हणून फॉर्मवरील विविध माहिती भरावी लागते. विशेष विवाह नोंदणी कायदा १९५४ प्रकरण-२ मध्ये काही शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. त्यात विवाह करण्यास आणि संततीला जन्म देण्यास अपात्र ठरेल, अशा प्रकारे त्याच्या मानसिकतेत बिघाड झालेला नाही ना किंवा त्याला वारंवार भ्रमिष्टाचे झटके येत नाहीत ना, हे जाहीर करण्याची तरतूद आहे. हा प्रकार अनेकांना तापदायक वाटत असून लग्नवेदीवर उभ्या असलेल्यांच्या सारासार विवेकबुद्धीवर शंका घेण्यालाच विरोध होत आहे. बौद्धिकतेवर शंका उपस्थित केल्यासारखा वाटतो आहे.

ख्यातनाम विधिज्ञ जाई वैद्य म्हणतात की, सेल्फ अ‍ॅटेस्टेशन किंवा पासपोर्ट मिळण्याकरिता आपण जसे प्रतिज्ञापत्र देतो, तशी ही तरतूद आहे. या ठिकाणी आपण विवाहाचा निर्णय विचारपूर्वक घेतला असून विवाहानंतर निर्णय व जबाबदारी घेण्यास सक्षम असल्याची कबुली द्यायची आहे. मात्र, अशी कबुली दिल्यानंतर जर एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे आढळले, तर घटस्फोटाबरोबरच लग्न रद्द करण्याकरिता अर्ज करता येईल. मात्र, अशा अर्जाबरोबर त्या व्यक्तीसाठी त्याची जबाबदारी घेईल, असा ‘पालक’ नेमण्याचाही अर्ज करावा लागतो.

विवाहावेळी आपल्या मानसिकतेबाबत असे जाहीरपणे लिहून देणे, ही बाब आश्चर्यकारक वाटत असली तरी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी येणाºया अनेक केसेसमध्ये एकमेकांवर वेडेपणाचे आरोप केले जातात. याचा आयक्यू कमी आहे, त्याचे वागणे वेड्यासारखे आहे, तो कधीकधी वेड्यासारखा बोलतो आणि आम्हाला हे आधी सांगितले नव्हते, असे आरोपप्रत्यारोप सर्रास केले जातात, असे ठाणे कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक माधवी देसाई यांनी सांगितले. काहींचा बुद्धयांक हा कमी असतो. परंतु, म्हणून त्यांना यावरून वेडे ठरवणे अयोग्य आहे. मात्र, काहींची मानसोपचारतज्ज्ञाकडे मुळातच तपासणी सुरू असते. समुपदेशनादरम्यान असे लक्षात आल्यास आम्हीही त्यांना ट्रीटमेंट घेण्यास सुचवतो, असेही त्या म्हणाल्या.

विवाह कायद्यात तरतूद काहीही असली, तरी त्यासाठी भ्रमिष्टाचे झटके हा शब्दप्रयोग अयोग्य वाटतो. एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याविषयी असे शब्द वापरणेच चुकीचे आहे. वेडा नसलेल्या व्यक्तीतही अशाने वेडेपणाची भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत कौटुंबिक न्यायालयाच्या एका वकिलांनी व्यक्त केले.

Web Title: There is a growing trend of going crazy after marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न