ठाणे: सोशल मीडियावर सध्या २ ऑगस्ट, २०२५ रोजी खग्रास सूर्यग्रहणामुळे संपूर्ण जग ६ मिनिटांसाठी अंधारात बुडणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र, या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे.
सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी, म्हणजे २०२५ मध्ये, २ ऑगस्ट रोजी कोणतेही ग्रहण होणार नाही आणि त्यामुळे पृथ्वीवर ६ मिनिटे अंधार होण्याची शक्यता नाही. ही बातमी पूर्णपणे खोटी आहे.
२०२७ मधील ग्रहणाबद्दल स्पष्टतासोमण यांनी पुढे सांगितले की, दोन वर्षांनी, म्हणजे २ ऑगस्ट, २०२७ रोजी नक्कीच ६ मिनिटांचे खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. परंतु, त्या वेळीदेखील संपूर्ण पृथ्वीवर अंधार होणार नाही. भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेल, असेही त्यांनी नमूद केले.
या वर्षातील (२०२५) ग्रहणांची माहिती:दा. कृ. सोमण यांनी या वर्षी होणाऱ्या चंद्र-सूर्य ग्रहणांविषयी माहिती दिली.
खग्रास चंद्रग्रहण: रविवार, ७ सप्टेंबर, २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण होईल. हे ग्रहण भारतातून रात्री ९ वाजून ५७ मिनिटांपासून ते उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांपर्यंत दिसेल.
खंडग्रास सूर्यग्रहण: रविवार, २१ सप्टेंबर, २०२५ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण होईल. मात्र, हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, असे सोमण यांनी सांगितले.
त्यामुळे २ ऑगस्ट रोजी जग अंधारात बुडणार असल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन दा. कृ. सोमण यांनी केले आहे.