‘गडकरी रंगायतन’ची आसन क्षमता होणार कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:14 IST2025-01-29T12:14:24+5:302025-01-29T12:14:37+5:30
९६० आरामदायी खुर्च्या बसवल्या जाणार.

‘गडकरी रंगायतन’ची आसन क्षमता होणार कमी
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. परंतु, आता नव्याने होऊ घातलेल्या रंगायतनमध्ये आरामदायी खुर्च्यांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. त्यामुळे रंगायतनमधील आसन क्षमता कमी होणार असून, आता ९६० प्रेक्षक बसू शकणार असल्याची माहिती पुढे आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅप्सूल लिफ्ट, दोन वाढीव शौचालये आणि ४७ वर्षांनंतर येथील पडदा बदलला जाणार असून, त्याच महिलेला पुन्हा तसाच पडदा बनविण्याचे काम देण्यात आले आहे.
सन १९७८मध्ये बांधलेल्या रंगायतनची आसनक्षमता सध्या १,०८० एवढी आहे. पूर्वी आखूड खुर्च्या होत्या. त्यामुळे बसण्यासही रसिकांना त्रास होत होता. आता येथे आरामदायी खुर्च्या बसविल्या जाणार आहेत. त्यामुळे आसनक्षमता १२०ने कमी होणार आहे. याशिवाय या ठिकाणी येणाऱ्या ज्येष्ठांना आता पायऱ्या चढाव्या लागणार नाहीत. त्यांना या ठिकाणी पारदर्शक पद्धतीची कॅप्सूल लिफ्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे. सध्या या ठिकाणी अवघ्या दोन ते तीन तिकीट खिडक्या आहेत. परंतु, आता या खिडक्यांची संख्या वाढविली जाणार आहे. या ठिकाणी आता सहा खिडक्या होणार आहेत.
पडदा कात टाकणार
गडकरी रंगायतनचा पडदा खादी आणि गादीच्या कापडाचा वापर करून ४७ वर्षांपूर्वी अवघ्या २० हजारांत नंदा चारी या विद्यार्थिनी असताना तयार केला गेला. परंतु, आता त्याच पद्धतीचा अगदी तसाच पडदा तोदेखील नंदा यांच्याच हातून तयार करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार आता पडद्याचे कामही सुरू झाले असून, त्यावर २२ लाख रुपये खर्च होणार आहे.
...ही केली जाणार कामे
मुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नूतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदलणे, रंगकर्मींसाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा करणे, रंगमंच - फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलित यंत्रणेत सुधारणा, शौचालयांचे संपूर्ण अद्ययावतीकरण आदी कामांचा समावेश असल्याचे आहे. या कामासाठी २३ कोटींचा खर्च केला जाणार आहे. राज्य शासनाकडून हा निधी ठाणे महापालिकेला उपलब्ध झाला आहे.