भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीवर पाणी संकट; ग्रामस्थांचे हंडा मोर्चाचे आयोजन
By नितीन पंडित | Updated: January 10, 2023 18:39 IST2023-01-10T18:39:24+5:302023-01-10T18:39:56+5:30
भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीवर पाणी संकटामुळे सरपंचानी मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे.

भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीवर पाणी संकट; ग्रामस्थांचे हंडा मोर्चाचे आयोजन
भिवंडी : भिवंडी शहरालगत असलेल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना स्ट्रेम वॉटर डिस्ट्रीब्यूटर कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व अत्यल्प होत असल्याने शेलार ग्रामपंचायतीवर पाणी संकट ओढवले आहे. स्टेम प्राधिकरणाला शेलार ग्रामपंचायतच्या वतीने वारंवार लेखी निवेदने व तक्रारी अर्ज करूनही स्टेम प्राधिकरण शेलार ग्रामपंचायतच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याने, शेलार ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट झाली आहे.
स्टेम प्राधिकरणाच्या या नियोजनशून्य कारभाराविरोधात शेलार ग्रामपंचायतचे सरपंच अॅड. किरण चन्ने यांनी गुरुवारी १२ जानेवारी रोजी सकाळी १२ वाजता पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चाचे आयोजन केले असून स्टेम प्राधिकरणाचे अभियंता प्रथमेश पाटील यांना तत्काळ निलंबित करावे अशी मागणी देखील सरपंच चन्ने यांनी शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.