गडावर सात ट्रेकर्सच्या सुटकेचा ९ तास रंगला थरार; भटकंती करताना आधी वाट चुकले, नंतर तरुणीला आली भोवळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 06:15 IST2025-04-07T06:15:41+5:302025-04-07T06:15:58+5:30
नऊ तासांच्या थरारक प्रयत्नानंतर सातही जणांची सुखरूप सुटका केली.

गडावर सात ट्रेकर्सच्या सुटकेचा ९ तास रंगला थरार; भटकंती करताना आधी वाट चुकले, नंतर तरुणीला आली भोवळ
लोकमत न्यूज नेटवर्क, माथेरान : मुंबईतील सात जणांचा एक गट ट्रेकिंगसाठी माथेरानजवळच्या विकट गडावर (पेब किल्ला) गेला होता. ट्रेकिंग करत असताना या भागात त्यांनी भटकंतीही केली. मात्र, काही वेळानंतर ते वाट चुकले. वाट चुकल्यानंतर यातून बाहेर पडण्यासाठी ते सर्व जण प्रयत्न करत असतानाच एका तरुणीला भोवळ आली. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या या हौसी ट्रेकर्सच्या मदतीसाठी अखेर नेरळ पोलिस आणि आपत्कालीन सामाजिक संस्था आल्या. त्यांनी नऊ तासांच्या थरारक प्रयत्नानंतर सातही जणांची सुखरूप सुटका केली.
पवई परिसरातील तरुण
पवई आणि परिसरात राहणारे तेजस ठाकरे, निकिता जॉबे, हिबा फातिमा, निखिल सिंग, सोनू साहू, चेतन पाटील, साहील लेले यांचा एक गट शनिवारी दुपारी पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता. काही वेळ ट्रेकिंग केल्यानंतर ते रस्ता चुकले. परंतु, योगायोगाने काही स्थानिक तिथे असल्याने त्यांच्या माहितीच्या आधारे ते किल्ल्यावर चढू लागले. मात्र, त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. ते पुन्हा रस्ता चुकले. त्याचवेळी एका तरुणीला उन्हाचा त्रास झाला. तिला भोवळ आली.
हेल्पलाइनवर संपर्क
पाणी, अन्न संपल्याने तरुणांनी ११२ या हेल्पलाइनवर संपर्क साधला. नेरळ पोलिस ठाण्यातील अधिकारी शिवाजी ढवळे यांनी माथेरानच्या सह्याद्री आपत्कालीन सामाजिक संस्था आणि स्थानिक तरुणांना मदतीसाठी पाठवले.
मदतीसाठी हेलिकॉप्टर द्या
किल्ला चढून थकल्याने तरुणांनी मदतीसाठी गेलेल्यांकडे हेलिकॉप्टर मागविण्याची मागणी केली. संस्थेच्या सदस्यांनी या किल्ल्यावर हेलिकॉप्टर उतरू शकत नाही हे पटवून देत त्यांना पाणी, अन्न देऊन धीर दिला. त्यानंतर सातही जणांची सुखरूप सुटका करून सायंकाळी गडाच्या खाली आणले.