युतीचा मुकाबला कोण करणार याचेच कुतूहल; फाटाफुटीमुळे क्षीण झाली ताकद
By नितीन पंडित | Updated: December 16, 2025 11:36 IST2025-12-16T11:35:28+5:302025-12-16T11:36:02+5:30
भिवंडी महापालिका निवडणुकीत मागील वेळी कॉंग्रेसला मोठे यश मिळाले होते. काँग्रेसचे ४७ नगरसेवक विजयी झाले होते.

युतीचा मुकाबला कोण करणार याचेच कुतूहल; फाटाफुटीमुळे क्षीण झाली ताकद
नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी महापालिका निवडणुकीत मागील वेळी कॉंग्रेसला मोठे यश मिळाले होते. काँग्रेसचे ४७ नगरसेवक विजयी झाले होते. फाटाफूट व गेल्या काही वर्षात झालेली वाताहत यामुळे काँग्रेसची ताकद क्षीण झाली. भिवंडी या मुस्लीमबहुल महापालिकेत यावेळी कोणता पक्ष बाळसे धरणार व भाजप-शिंदेसेना युतीचा सामना कोण करणार, याकडे लक्ष लागले आहे.
एकहाती सत्ता असतानाही काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेत उपमहापौरपद दिले. काँग्रेसचे जावेद दळवी महापौर, तर शिवसेनेचे मनोज काटेकर हे उपमहापौर झाले होते. अडीच वर्षानंतर काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी कोणार्क विकास आघाडीला समर्थ दिल्याने अवघे चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीने भाजपच्या पाठिंब्याने आपली सत्ता स्थापन केली. काँग्रेसच्या फुटीर १८ नगरसेवकांवर कोकण आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगरल्याने हे १८ नगरसेवक व इतर २ असे २० नगरसेवक शरद पवार गटात सहभागी झाले. तत्कालीन नगरविकास मंत्री व मुख्यमंत्री यांनी या १८ नगरसेवकांवर बडतर्फीची कारवाई केल्याने या बंडखोरांना या महापालिका निवडणुकीत सहभागी होता येणार नसल्याने त्यांच्यासमोर नवे आव्हान असणार आहे.
२०१७ चे पक्षीय बलाबल - २० नगरसेवक
काँग्रेस - ४७
भाजप - १९
शिवसेना - १२
कोणार्क आघाडी - ४
आरपीआय एकतावादी - ४
समाजवादी - २
अपक्ष - २
सध्या कुणाकडे किती माजी नगरसेवक ?
काँग्रेस - २९
भाजप - १९
शिंदेसेना - १२
कोणार्क आघाडी - ४
समाजवादी - २
लोकसभेत भाजपचे कपिल पाटील यांना पराभवाचा धक्का बसला, तर विधानसभेत प्रस्थापितांनी यश मिळवले. कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यावेळी भिवंडी पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक अपक्ष लढले. आता ते कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.