बेड उपलब्ध नसल्याचा बोर्ड लगबगीने काढला;प्रसूतीच्या बेडची संख्या ५० वरून १०० हाेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 06:14 IST2025-10-28T06:13:57+5:302025-10-28T06:14:10+5:30
रुग्णालयातील त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश आ. वाघ यांनी प्रशासनाला दिले.

बेड उपलब्ध नसल्याचा बोर्ड लगबगीने काढला;प्रसूतीच्या बेडची संख्या ५० वरून १०० हाेणार
ठाणे : कळवा येथील ठाणे महापािलकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूती विभागातील गैरसाेयींकडे लक्ष वेधणाऱ्या ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल भाजपच्या विधान परिषदेच्या आ. चित्रा वाघ यांनी घेतली. साेमवारी त्यांनी या रुग्णालयात भेट देऊन आढावा घेतला. आगामी वर्षात या रुग्णालयाच्या एकूण बेडची संख्या ५०० वरून ८५० हाेणार असून महिलांच्या प्रसूती बेडची संख्याही ५० वरून १०० हाेणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने त्यांना दिली. रुग्णालयातील त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश आ. वाघ यांनी प्रशासनाला दिले.
कळव्यातील या रुग्णालयाच्या प्रसूतिगृहात गराेदर महिलांची गैरसाेय हाेत आहे. तसेच प्रसूती विभागावर ताण असल्यामुळे क्षमतेपेक्षा दाटीवाटीने बेड लावून, तर काही महिलांना चक्क वेटिंगवर ठेवत कशी गराेदर महिलांची ओढाताण हाेत असल्याचे वृत्त ‘लाेकमत’ने २६ आणि २७ ऑक्टाेबर राेजी प्रसिद्ध केले. याचीच दखल घेत आ. वाघ यांनी साेमवारी सायंकाळी ४:३० ते ५:३० या दरम्यान रुग्णालयात जाऊन येथील गैरसाेयींचा रुग्णालयाचे अधीक्षक अनिरुद्ध माळगावकर यांच्यासह प्रशासनाकडून आढावा घेतला.
प्रशासनाची धावपळ...
आ. वाघ यांनी अचानक भेट दिली. रुग्णांबद्दल माहिती घेतली. त्या येताच कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. प्रसूती कक्षासमोरील बेड उपलब्ध नसल्याचा बोर्ड लगबगीने काढून टाकण्यात आला.
रुग्णालयावर ताण असल्याचे मान्य
गराेदर महिलांना होणाऱ्या त्रासाबाबत आपण पालिका आयुक्त आणि रुग्णालय प्रशासनाकडून आढावा घेतला. रुग्णालयात २५ गराेदर महिलांची सुविधा आहे. त्यापेक्षा अधिक महिला दाखल आहेत. ठाणे-कल्याण-भिवंडी-भाईंदर येथूनही महिला येतात. हॉस्पिटलवर ताण आहे. त्रुटींवर बाेट ठेवतानाच डिलीव्हरीनंतर महिलांना दिले जाणारे १५ वस्तूंचे किट, कॅशलेस सुविधांसह डाॅक्टरांकडून मिळणाऱ्या चांगल्या आराेग्य सुविधा अशा बाबींचे काैतुक केले. भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या मृणाल पेंडसे याही त्यांच्या समवेत हाेत्या.