-जितेंद्र कालेकरठाणे : राबोडीतील मनसेचे शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांची चार वर्षांपूर्वी गोळीबार करून दोघांनी हत्या केली. यातील हल्लेखोरांसह चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अटकही केली. मात्र, यातील मुख्य सूत्रधारासह दोघांचा शोध सुरूच आहे. त्यामुळेच हे संपूर्ण प्रकरणच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी देण्याची मागणी जमीलच्या नातेवाइकांनी केली आहे.
ठाण्याच्या राबोडीतील बिस्मिल्ला हॉटेलसमोरून २४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी दोनच्या सुमारास जमील यांचा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून खून केला होता. या घटनेचे ठाण्यात तीव्र पडसाद उमटले होते. या गुन्ह्यातील दुचाकीस्वार शाहिद शेख (२२) याला राबोडीतून तर गोळी झाडणाऱ्या इरफान शेख याला उत्तर प्रदेशातून गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने अटक केली होती.
फरार ओसामाचा शोध सुरू असतानाच युनिट एकच्या ठाणे पथकाच्या हाती हबीब शेख याचाही या खुनातील सहभाग असल्याचे काही पुरावे लागले. त्याआधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाने त्याला २४ सप्टेंबर २०२३ रोजी अटक केली.
त्यापाठोपाठ ओसामा यालाही उत्तर प्रदेशच्या एसटीएफचे अधीक्षक बृजेश सिंह यांच्या मदतीने १२ फेब्रुवारी २०२४ अटक केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर खीरिया गावातील रहिवासी असलेल्या ओसामा याने त्याच्या गावातील इरफान ऊर्फ सोनू याच्या मदतीने जमीलची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. मात्र आजही या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मोकाट आहे.
मुख्य सूत्रधाराला कोणाचे संरक्षण?
या हत्या प्रकरणात अजित पवार गटाचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर जमीलच्या नातेवाइकांनी संशय व्यक्त केला होता. पोलिसांच्या तपासात मात्र नजीब यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे समोर आले नाहीत. या हत्येचा नेमका उद्देशही स्पष्ट झाला नाही. त्यामुळेच या खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी जमीलचे मेव्हणे फजल सलेमानी शेख यांनी केली आहे.
खुनाच्या बदल्यात मिळणार होती चार घरे
जमीलच्या खुनाच्या बदल्यात ओसामाला चार घरे मिळणार होती. ती कोणाकडून मिळणार होती? यातील सूत्रधार कोण आहे? याचा उलगडा अजूनही झालेला नसल्याचे त्याचे नातेवाईक सांगतात. मात्र, ओसामाला आश्रय देणाऱ्यांसह अन्य एक अशा दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट १चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली.
‘त्या’ महिलेच्या हत्येचे गूढ कायम
ठाणे ग्रामीणमधील कसारा भागात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेचा चार महिन्यांपूर्वी खून झाला. तिचा मृतदेह नाशिक महामार्गालगत मिळाला होता.
उत्तरीय तपासणीमध्ये तिचा कोणीतरी गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा कसारा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास करण्यात येत आहे.
यातील मारेकरी कोण? खून कोणत्या कारणांसाठी झाला? या सर्व बाबींचा छडा अजूनही लागलेला नसल्याचे ठाणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.