गर्भवतीला नेताना जीपला मारले धक्के; रस्ता नसल्याने तुडवावा लागतो चिखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 13:20 IST2022-08-18T13:19:42+5:302022-08-18T13:20:01+5:30
पाचघर हे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाव असून १०० टक्के आदिवासी लोकवस्ती आहे.

गर्भवतीला नेताना जीपला मारले धक्के; रस्ता नसल्याने तुडवावा लागतो चिखल
वाडा : तालुक्यातील पाचघर या गावात जायला पक्का रस्ता नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. १५ ऑगस्ट रोजी येथील एका महिलेला प्रसूतीसाठी वेदना व्हायला लागल्या. त्यानंतर या गावात एकमेव असलेली जीप काढण्यात आली. रस्ता म्हणजे चिखलाचीच वाट असल्याने धक्के मारून मुख्य रस्त्यापर्यंत ही गाडी आणावी लागली. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी गाडी पोहचली. तिथपर्यंत बराचशा वेळ गेल्याने महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला नंतर ठाणे येथील कळवा रुग्णालयात नेऊन तिथे तिची प्रसूती झाली. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
पाचघर हे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाव असून १०० टक्के आदिवासी लोकवस्ती आहे. या गावात जायला आजही पक्का रस्ता नाही. त्यामुळे चिखलमय झालेला रस्ता तुडवीत काही किलोमीटर अंतर पार करून मग मुख्य रस्त्यापर्यंत यावे लागते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच आजही येथील गावपाड्यांना रस्ते नाहीत. पिण्याचे शुद्ध पाणी नाही. आरोग्याच्या सुविधा नाहीत. रोजगार उपलब्ध नाही. अशा भयानक परिस्थितीला आदिवासी बांधवांना सामोरे जावे लागत आहे.
बाळ, बाळंतिणीची प्रकृती सुखरूप
१५ ऑगस्ट रोजी पाचघर येथील ज्योती दोडे या महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. त्यानंतर या गावात एकमेव असलेली जीप काढण्यात आली. रस्ता चिखलमय असल्याने या जीपला तरुणांनी धक्के मारीत काही किलोमीटर अंतरापर्यत आणले. त्यानंतर मुख्य रस्त्याला जीप आली. नंतर तिला वाडा ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासल्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला कळवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे तिची प्रसूती व्यवस्थितपणे पार पडली. सुदैवाने माता व बालक दोघांची प्रकृती ठणठणीत आहे, मात्र रस्ता नसल्यामुळे प्रवास करताना वेळेचा अपव्यय झाल्याने काही अप्रिय घटना घडली नाही, हे सुदैव.