राम मंदिर सोहळ्याच्या सुटीमुळे अंतिम मतदारयाद्या मंगळवारी होणार प्रसिद्ध
By सुरेश लोखंडे | Updated: January 21, 2024 18:59 IST2024-01-21T18:58:03+5:302024-01-21T18:59:03+5:30
सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदारयाद्या २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

राम मंदिर सोहळ्याच्या सुटीमुळे अंतिम मतदारयाद्या मंगळवारी होणार प्रसिद्ध
ठाणे : विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या २२ जानेवारीला प्रसिध्द हाेणार हाेत्या. मात्र श्री. रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील या अंतिम मतदारयाद्या २३ जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहेत, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
सुधारीत कार्यक्रमानुसार मतदारयादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिवस २२ जानेवारी असा होता. पण या दिवशी राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यास अनुसरून राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदारयाद्या २३ जानेवारी रोजी प्रसिध्द करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या बदललेल्या वेळापत्रकाप्रमाणे मतदारयादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येईल, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कदम यांनी केले आहे.