महायुती विरुद्ध मनसेसह मविआ यांच्यातच लढत; ठाणे महापालिकेतील बदललेले पक्षीय बलाबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:16 IST2025-12-16T11:15:37+5:302025-12-16T11:16:14+5:30
मागील २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्ता संपादित केली होती. भाजप त्यावेळी स्वबळावर लढली होती; परंतु त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

महायुती विरुद्ध मनसेसह मविआ यांच्यातच लढत; ठाणे महापालिकेतील बदललेले पक्षीय बलाबल
अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेत मागील २९ वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. तीन वर्षापूर्वी बदललेल्या समीकरणांमुळे शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना आणि शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट यांच्यात संघर्ष सुरू आहे. मात्र, ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेसेना व भाजपची युती झाली नाही तर याच दोन पक्षांत लढत पाहायला मिळेल. मुंबईत महाविकास आघाडी भंगताना दिसत असली तरी ठाण्यात महाविकास आघाडीत मनसेला सामावून घेतले जाण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे भाजप-शिंदेसेना युती झाली तर उद्धवसेना, शरद पवार गट, काँग्रेस व मनसे अशी आघाडी युतीचा सामना करील.
ठाण्यात शिंदेसेनेकडे अधिक नगरसेवक आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश ही भाजपची ताकद आहे. शरद पवार गटाचे पारडे अजित पवार गटाच्या तुलनेत जड आहे. महायुतीमुधून अजित पवार गट बाहेर पडला असून, त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. मतांचे धुव्रीकरण रोखण्यासाठी ही खेळी असल्याची चर्चा सुरू आहे. उद्धसेना, मनसे, शरद पवार गट एकत्र आले आहेत. त्यांच्यासाठी जागावाटप हे आव्हान राहील. मागील २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्ता संपादित केली होती. भाजप त्यावेळी स्वबळावर लढली होती; परंतु त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
२०१७ चे पक्षीय बलाबल १३१ नगरसेवक
शिवसेना - ६८
भाजप - २३
राष्ट्रवादी - ३५
काँग्रेस - ३
एमआयएम - २
अपक्ष - १
सध्याचे पक्षीय बलाबल
शिदेसेना - ७९
भाजप - २४
अजित पवार गट - ९
शरद पवार गट - ११
उद्धवसेना - ३
काँग्रेस - ३
एमआयएम - २