- पंकज पाटील अंबरनाथ - अंबरनाथ नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत शिंदे सेना आणि भाजपाचा वाद पुन्हा एकदा चिघळला. संख्याबळाच्या जोरावर शिंदे सेनेच्या सर्व नगरसेवकांनी भाजपाच्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांना विरोध करत हे सर्व विषय रद्द केले तर दुसरीकडे शिंदेसेनेच्या सर्व नगरसेवकांचे विषय मंजूर करण्यात आले.
अंबरनाथ नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज पालिका सभागृहात पार पडली. या सभेत प्रशासनाच्या विषयासोबत सर्व नगरसेवकांच्या प्रभागातील पावसाळापूर्वीची कामे करण्याच्या अनुषंगाने 25 लाखांचे विषय घेण्यात आले होते. सर्व नगरसेवकांना समान कामांचे वाटप करून नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे समान विकास धोरण शिंदे सेनेच्या पचनी पडले नाही. शिंदे सेनेचे नगरसेवक अब्दुल शेख यांनी विषय पत्रिकेतील अनुक्रमांक वाचून अप्रत्यक्ष शिंदे सेनेतील प्रभागातील विषयांना मंजुरी देण्याचा आणि भाजपाच्या प्रभागातील कामे रद्द करण्याची सूचना केली. त्यांच्या या सूचनेला नगरसेवक संदीप तेलंगे यांनी अनुबोधन दिले. शिंदे सेनेच्या या खेळीमुळे भाजपचे नगरसेवक आक्रमक होतील अशी अपेक्षा होती. मात्र भाजपाच्या नगरसेवकांनी शिंदे सेनेच्या नगरसेवकांचा हा खेळ केविळवाणा असल्याचा आरोप केला. शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी भाजपाच्या प्रभागातील कामांना विरोध केला असला तरी आम्ही शिंदे सेनेच्या प्रभागातील कामांना विरोध करणार नाही अशी ठाम भूमिका घेत शिंदेसेनेला चपराक लगावली.
- आजच्या सभेमध्ये शिंदेसेना आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांची समान कामे घेण्यात आली होती. मात्र शिंदेसेनेने स्वतःची कामे संख्याबळाच्या जोरावर मंजूर करून घेतली तर बीजेपीची सर्व कामे रद्द ठरवली.- यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी कोणताही संताप व्यक्त न करता शिंदे सेनेचा विकास कामांना असलेला विरोध नोंदवण्याची सूचना केली.- सभागृहात मोठ्या प्रमाणात वाद होतील अशी अपेक्षा असताना भाजपच्या नगरसेवकांनी शिंदे सेनेने विकास कामांना केलेला विरोध म्हणजे पाप असून त्यांचे हे पाप नागरिकांपर्यंत नेण्याचे काम आमचे नगरसेवक करतील अशी ठाम भूमिका घेतली.
Web Summary : Ambernath: Shinde Sena and BJP clash over development works. Shinde Sena councillors rejected BJP's proposals, approving their own. BJP alleges obstruction.
Web Summary : अंबरनाथ: विकास कार्यों को लेकर शिंदे सेना और भाजपा में टकराव। शिंदे सेना के पार्षदों ने भाजपा के प्रस्तावों को खारिज कर दिया, अपने प्रस्तावों को मंजूरी दे दी। भाजपा ने बाधा डालने का आरोप लगाया।