‘आजपर्यंत गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतलेले नाही’, उज्ज्वल निकम यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 09:39 IST2025-01-20T09:39:34+5:302025-01-20T09:39:46+5:30
Ujjwal Nikam : मी वकिली क्षेत्रात आल्यानंतर आपण गुन्हेगारीविरुद्ध लढायचे, असे ठरवले. मी आजपर्यंत गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतलेले नाही. मी गुन्हेगारांविरोधातच लढत आलो आहे, असे स्पष्ट मत विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी रविवारी व्यक्त केले.

‘आजपर्यंत गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतलेले नाही’, उज्ज्वल निकम यांचं विधान
ठाणे - मी वकिली क्षेत्रात आल्यानंतर आपण गुन्हेगारीविरुद्ध लढायचे, असे ठरवले. मी आजपर्यंत गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतलेले नाही. मी गुन्हेगारांविरोधातच लढत आलो आहे, असे स्पष्ट मत विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी रविवारी व्यक्त केले.
मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेतर्फे आयोजित करिअर कट्ट्याच्या दुसऱ्या पुष्पात निकम यांनी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, न्यायाधीशांसमोर बोलताना वकिलाच्या आवाजात चढ-उतार असायला हवा. सामान्य माणूस जेव्हा वकिलाकडे येतो, तेव्हा अशिलाला प्रामाणिक सल्ला देणे हे वकिलाचे कर्तव्य आहे. खोटी आश्वासने देऊन फसवू नये. कसाबच्या खटल्याबद्दल सांगताना ते म्हणाले की, कसाबला फाशी देणे हे माझ्या दृष्टीने आव्हानात्मक नव्हते. हा दहशतवाद कोणी घडवला, यामागे कोणाची ताकद होती, हे जगाला समजले पाहिजे, म्हणून हा खटला इन कॅमेरा चालवायचा नाही, असे ठरवले. विद्याधर ठाणेकर यांनी प्रास्ताविक, तर विश्वस्त मकरंद जोशी यांनी निवेदन केले.
मृत्यूबाबत पाकिस्तानने शंका घेतली नाही
मी जेव्हा लोकसभा निवडणुकीला उभा होतो, तेव्हा काही नेत्यांनी माझ्यावर मुक्ताफळे उधळली. कसाबने पोलिस अधिकाऱ्यांना मारले नाही, त्यांना दुसऱ्याने, आपल्याच भारतीयांनी मारले, असे त्यांच्याकडून सांगितले जात होते. त्यावेळी मी त्यांचा समाचार घेतला. कसाबला फाशी देण्याबाबत किंवा शहीद झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूबाबत पाकिस्ताननेही शंका उपस्थित केली नाही, पण आमच्यातील काही महाभागांनी ती उपस्थित केली, असा आरोप त्यांनी केला.