ठाणे - बदलापूर अत्याचारातील आराेपी अक्षय शिंदेचे आपण कुठेही गुणगान केलेले नाही. तो गुन्हेगार होता तर त्याला कायद्याने शिक्षा व्हायला हवी होती, पण त्याला चार फुटांवरून गोळी घालणे हे न्यायालयालाही मान्य नाही, आम्ही नव्हे तर न्यायमूर्तीच अक्षयचा खून झाला असे म्हणत आहेत. अक्षयचा एन्काउंटर नव्हे तर खून झाला, हे आमचे मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. घरात घुसून बायकांना मारले याला जबाबदार काेण, असा सवालही त्यांनी केला.
ठाण्यात पत्रकारांना आव्हाड म्हणाले की, बदलापूरच्या त्या शाळेचा सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेला? त्याचे फुटेज कुठे गेले? आपटेंची चौकशी का झाली नाही? गुन्हा नोंदवायला सात तास का लागले? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायला हवी. कोर्टाने सांगून पण सरकार अक्षयच्या प्रकरणात गुन्हा नोंदवायला तयार नाही.