चालकाचे नियंत्रण सुटल्याने रसायनाचा कंटेनर उलटला, चालक जखमी
By जितेंद्र कालेकर | Updated: April 28, 2023 17:43 IST2023-04-28T17:43:07+5:302023-04-28T17:43:37+5:30
या घटनेत चालक शीतजित चौधरी (२४) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने रसायनाचा कंटेनर उलटला, चालक जखमी
ठाणे : गायमुख येथून घोडबंदर रोडने ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सुरत ते मुंबईकडे बेंझिल क्लोराईड या रसायनाचे ८० ड्रम घेऊन निघालेला कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या कंटेनरमधील तेल रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी मार्गिका बंद ठेवली होती. तर ठाण्याकडून जाणाऱ्या मार्गिकेवरून वाहतूक सुरू ठेवल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. सुमारे दोन तासांनी कंटेनर बाजूला केल्यावर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेत चालक शीतजित चौधरी (२४) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
सुरत वरून मुंबईकडे बेंझिल क्लोराईडचे ८० ड्रम (प्रति ड्रम २२०-लीटर याप्रमाणे एकूण-१७६०० लीटर) घेऊन निघालेला हा कंटेनर घोडबंदर रोड वरील गायमुख घाटात उलटल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. उलटलेल्या कंटेनरमधील तेल रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी मार्गिका बंद ठेवली होती. त्यामुळे ठाण्याकडून जाणाऱ्या मार्गिकेवरुन सुरू ठेवल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. रस्त्यावर पडलेल्या आॅईलवर आपत्ती व्यवस्थापन विभागाने माती टाकून त्याची सफाई केली. तर वाहतूक नियंत्रण शाखेने एका क्रेन मशिनसह अग्निशमन दलाच्या मदतीने सुमारे दोन तासांनी हा कंटेनर उचलून बाजूला केला. त्यानंतर ही मार्गिका वाहतूकीसाठी खुली झाली. या अपघातात चालक चौघरी यांच्या पाठीला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.