भिवंडीत हरवलेल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याचे मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडले
By नितीन पंडित | Updated: January 28, 2024 19:30 IST2024-01-28T19:30:18+5:302024-01-28T19:30:26+5:30
रविवारी दोन दिवसानंतर या चिमुरड्याचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत आढळून आला आहे.

भिवंडीत हरवलेल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याचे मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडले
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : शहरातील वाजा मोहल्ला येथील पालिका कर्मचारी कॉलनी मध्ये राहणारा तीन वर्षीय चिमुरडा शुक्रवारी हरवल्याची घटना घडली होती. रविवारी दोन दिवसा नंतर या चिमुरड्याचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत आढळून आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विद्यांश गोपाळ चौहान वय ३ वर्षे असे पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाकलेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
विद्यांश हा आपले आई वडील व आजी आजोबांसोबत राहत होता. शुक्रवारी दुपारी पाऊणे चार वाजताच्या सुमारास विद्यांश घरा बाहेर पडला होता. परंतु तो घरी न आल्याने व परिसरात शोध घेऊन ही न सापडल्याने आई ममता चौहान यांनी दिलेल्या तक्रारी वरून भिवंडी शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.रविवारी त्याचा मृतदेह राहत्या इमारतीच्या जिन्या खाली असलेल्या पाण्याच्या टाकीत सापडला. सदर मृतदेह स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून शहर पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.