- सुरेश लाेखंडे ठाणे - राज्याचे मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे राखलेल्या ठाणे जिल्ह्याचे २०२४-२५ या वर्षातील विविध मार्गांनी जमा झालेले महसुली उत्पन्न एक हजार ६९९ काेटी रुपये होते. मात्र, जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून विविध विकास कामांवर ३४ हजार ४८ काेटी ९१ लाख ८० हजार रुपये म्हणजे उत्पन्नाच्या २० पट निधी खर्च झाला. त्यामुळे जिल्ह्याची ‘आमदनी अठ्ठन्नी अन खर्चा रुपया’, अशी ऐश असल्याचे ३१ मार्चच्या आर्थिक ताळेबंदातून उघड झाले.
जिल्हा काेषागार कार्यालयाच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यातील आठ उपकाेषागार कार्यालये आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील ५२१ शासकीय कार्यालयांतील जमा-खर्चाचा हिशाेब त्यांना ठेवावा लागताे. हजारो काेटी रुपये वाटपही करावे लागते. ठाणे शहरात सर्वाधिक २९४ शासकीय कार्यालये आहेत.
अंबरनाथ तालुक्यावर सर्वात कमी खर्च या तालुक्यातून मिळालेले महसुली उत्पन्न २९९ काेटी ४३ लाख ८६ हजार रुपये आहे. जिल्ह्यात सर्वात कमी खर्च अंबरनाथ तालुक्यावर ४३ काेटी २८ हजार रुपये झाला. या तालुक्यातून तीन काेटी ९४ लाख ३१ हजार रुपये महसुली उत्पन्न जमा झाले.
३० हजार ९०० कोटी ठाण्यात झाले खर्चजिल्हा काेषागार कार्यालयात एक हजार ४२ काेटी ५० लाख रुपये जमा झाले. पण, विविध विकास कामांवर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३० हजार ९०० काेटी रुपये ठाण्यात खर्च झाले.
काेकणभवन कोषागार कार्यालयाकडे २१७ काेटी ३७ लाख रुपये उत्पन्न जमा झाले. जिल्ह्यातील कल्याण तालुक्यावर ६१९ काेटी आठ लाख रुपये खर्च झाले. जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे दाेन काेटी तीन लाख ६४ हजार रुपये मुरबाड तालुक्यातून जमा झाले.