ठाण्याची हवा झाली शुद्ध, गुणवत्ता निर्देशांक सरासरी ८४ इतका

By अजित मांडके | Published: April 25, 2024 03:22 PM2024-04-25T15:22:54+5:302024-04-25T15:23:23+5:30

मागील महिनाभरात शहराची हवा कधी शुद्ध गटात मोडली गेल्याचे दिसत आहे.

The air quality of Thane is clean, with an average quality index of 84 | ठाण्याची हवा झाली शुद्ध, गुणवत्ता निर्देशांक सरासरी ८४ इतका

ठाण्याची हवा झाली शुद्ध, गुणवत्ता निर्देशांक सरासरी ८४ इतका

ठाणे : ठाणे : एकीकडे ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असतांना दुसरीकडे हवेची गुणवत्ता मात्र सुधारली असल्याचे समाधानकारक चित्र ठाण्यात दिसू लागले आहे. मागील काही दिवसात हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरीपेक्षा कमी आढळला आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. मागील महिनाभरात शहराची हवा कधी शुद्ध गटात मोडली गेल्याचे दिसत आहे. त्यातही सध्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी ८४ एवढा आढळला आहे.

शहरात आजही विविध ठिकाणी विकास कामे सुरु आहेत. मेट्रोची, महापालिकेच्या माध्यमातून रस्त्याची कामेही सुरु आहेत. त्यातही रोजच्या रोज होणारी वाहतुक कोंडी यामुळे प्रदुषणात वाढच होतांना दिसत होती. प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेने ७ नोव्हेंबर २०२३ पासून मार्गदर्शक तत्वे जारी केली आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यास सुरवात केल्याचेही दिसून आले. त्यानुसार विकासकामांच्या ठिकाणी प्रदुषण रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजना, रस्त्यांची धुलाई, आदींसह इतर उपाय योजना करण्यात आल्याने ठाण्यातील हवेची गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचे दिसत आहे.

ठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर, तीन हाता नाका आणि उपवन येथील हवा मध्यम प्रदूषित गटात मोडत होती. परंतु एप्रिल महिन्यात शहराची हवेची गुणवत्ता शुद्ध गटात अर्थात हिरव्या रंगात आली आहे. त्यामुळे ठाण्याची हवा सध्या ठाणेकरांसाठी चांगली असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. तीन हात नाका येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील खाली आला आहे. याठिकाणी करण्यात आलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचे चित्र दिसत आहे. 

तसेच आता उपवन येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील कमलीचा सुधारल्याचे चित्र दिसून आले असून येथील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक २४ एप्रिल रोजी ७४ एवढा आढळला आहे.  तर घोडबंदर भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक याच दिवशी ९४ आढळला आहे. त्यातही या तीनही ठिकाणचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक एप्रिल महिन्यातील १६ तारखेला सरासरी१२३ एवढा आढळून आला आहे. परंतु त्यानंतर हवेचा निर्देशांकात सुधारणा झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले आहे.  त्यामुळे ठाण्याची हवा सद्धा शरीरास चांगली असल्याचेच दिसत आहे.

प्रदूषण विभागामार्फत हवेतील दर्जा तापसण्याबाबत सहा गट केलेले आहेत. यात हिरवा, पोपटी ,पिवळा, नारंगी, लाल आणि गडद तपकिरी या रंगाचा समावेश असतो. त्यात हिरवा रंग अति शुद्ध हवा म्हणून नोंद होते. तर हलका हिरवा हा शुद्ध, पिवळ्या रंगात मध्यम शुद्ध, नारंगी रंगात प्रदूषित तर लाल रंग असलेला परिसर अति प्रदूषित गटात मोडतो. तर गडद तपकिरी सर्वात जास्त प्रदूषित या गटात मोडतो. सध्या ठाणे शहर परिसर हा हिरव्या रंगाच्या गटात येत  आहे.  

हवेची गुणवत्ता
तारीख - घोडबंदर (ट्राफीक पार्क )  - उपवन - सरासरी
१९ एप्रिल २०२४ - ९३ - ७४ - ८३
२० - ९२ - ८७ - ८९
२१ एप्रिल - ८९  - ८६ - ८७
२२ एप्रिल - ७६ - ६० - ६८
२३ - ६८ - ६१ - ६४
२४ एप्रिल - ९४ - ७४ - ८४

Web Title: The air quality of Thane is clean, with an average quality index of 84

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.